ठाणे, ३ सप्टेंबर (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळेही आर्थिक संकटात सापडली असून मंडळांना महानगरपालिका, तसेच अग्नीशमन दलाकडून आकारण्यात येणारे मंडप शुल्क माफ करण्यात यावे, अशी मागणी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेकडे येथील गणेशोत्सव मंडळांनी केली होती. मुंबई आणि ठाणे महानगरपालिका यांनी मंडळांचे मंडप शुल्क रहित करण्याचा निर्णय घोषित केला; मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिका स्वतःचा निर्णय घोषित करत नव्हती. यावर ‘कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय संस्थे’ने ‘येथील मंडळे मंडप शुल्क भरणार नाही’, अशी चेतावणी महानगरपालिकेला दिली होती. अखेर २ सप्टेंबर या दिवशी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसोबत बैठक पार पडली. यात ९२ मंडळांनी सहभाग घेतला होता. त्या वेळी पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी ‘मंडळांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही; मात्र अनुमतीच्या जोडीला अग्नीशमन दलाचे, तसेच अन्य ‘ना हरकत प्रमाणपत्र’ घेणे मंडळांना बंधनकारक राहील’, असे सांगितले. अनुमती देण्यासाठी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करण्यात येणार आहे. महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घोषित केल्याने मंडळांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे ‘कल्याण शहर गणेशोत्सव समन्वय संस्थे’चे संस्थापक संतोष पष्टे यांनी सांगितले.