६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. सातेरी भुजंग पाटील (वय ८६ वर्षे) यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती !

१३.७.२०२१ या दिवशी नंदिहळ्ळी (जिल्हा बेळगाव, कर्नाटक) येथील सातेरी भुजंग पाटील (वय ८६ वर्षे) यांचे निधन झाले. त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, त्यांच्या शेवटच्या आजारपणात त्यांना झालेले त्रास आणि आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

कै. सातेरी पाटील

१. कष्टप्रद कौटुंबिक जीवन

१ अ. गरीब शेतकरी कुटुंबात जन्म होणे, आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कुटुंबियांचे हाल होणे आणि अशा कठीण परिस्थितीत इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण घेणे : ‘बाबांचा जन्म गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण आणि तरुणपण पुष्कळ कष्टात गेले. ते त्यांच्या कुटुंबात सर्वांत मोठे होते. ते स्वतः, आई (कै. सुभद्रा पाटील), वडील (कै. भुजंग पाटील), दोन भाऊ (कै. बाळाप्पा पाटील आणि श्री. परशुराम पाटील) आणि तीन बहिणी (श्रीमती रेणुका पाटील, श्रीमती मलप्रभा पाटील आणि सौ. प्रभावती पाटील), असे आठ जणांचे कुटुंब होते. बाबांचे वडील नाटक मास्तर असल्याने ते नाटक शिकवण्यासाठी ३ – ४ मास बाहेरच असायचे. आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने कुटुंबियांचे हाल होत असत. त्यांना कधी कधी चिंचोके (चिंचेच्या आतील बिया) शिजवून खावे लागायचे. अशा कठीण परिस्थितीत बाबांचे इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षण झाले.

१ आ. घरखर्चाला हातभार लावण्यासाठी शिक्षण सोडून मोलमजुरी करणे : घरखर्चाला हातभार लावण्यासाठी बाबांना शाळा सोडावी लागली आणि ते सावकार लोकांकडे नोकरी करू लागले. बाबांना लहान वयातच सावकारांकडची जनावरे पाळणे, गवत आणणे, अशी लहान-मोठी कामे करावी लागली. बाबा बाहेरगावी जाऊन मोलमजुरीही करायचे.

१ इ. पुष्कळ संघर्ष करून संसाराचे दायित्व पार पाडणे : बाबांनी स्वतःच्या विवाहानंतर त्यांच्या सर्व बहिणी आणि भाऊ यांचे विवाह पार पाडले. हे सर्व करतांना त्यांना पुष्कळ संघर्ष करावा लागला. त्या वेळी १०० रुपये ऋण घेतल्यावर १ पोते तांदुळ व्याज म्हणून द्यावे लागायचे. शेतात तांदुळाविना अन्य कोणतेही धान्य पिकत नव्हते. वर्षभरात पिकलेले पीक व्याज म्हणून सावकारांना द्यावे लागत असे. त्यामुळे पोटाचा प्रश्न तसाच असे. अशातच कुटुंब विभक्त झाले. प्रत्येक भावाला (१० फूट x १५ फूट) या आकाराची एकेक खोली मिळाली. घराचे छत डोक्याला लागत असे. आरंभी अशा दाटीवाटीच्या खोलीत बाबा, आई (कै. लक्ष्मी पाटील) आणि आम्ही पाच भावंडे (सौ. मंगला पाटील, सौ. द्वारका शिवणगेकर, श्री. मधु पाटील, सौ. शकुंतला शिवणगेकर आणि श्री. यल्लाप्पा पाटील) रहात होतो.

२. वडिलांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. यल्लाप्पा पाटील

२ अ. इतरांना साहाय्य करणे: बाबांना आर्थिक अडचणी असायच्या; पण कुणी त्यांना अडचणी सांगितल्या, तर बाबा त्यांना साहाय्य करायचे. त्यांना कुणाकडून कसलीच अपेक्षा नसायची.

२ आ. बाबांची त्यांच्या कुलस्वामिनीवर श्रद्धा होती. ते देवघरात उदबत्ती लावून देवाला नमस्कार केल्यावरच अन्य कामे करायचे. ते धार्मिक कार्यात स्वतःहून सहभागी व्हायचे.

२ इ. रामनाथी आश्रमात परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभल्यावर नामजप चालू होणे : त्यांनी रामनाथी आश्रमात पूर्वी १ वर्ष राहून तेथील लागवडीत सेवा केली. त्या काळात बाबांना परात्पर गुरुदेवांचा सत्संग लाभला. त्यामुळे त्यांचा नामजप चालू झाला. बाबा दत्तगुरूंचा नामजप अधिक करायचे.

२ ई. बाबांना शारीरिक त्रास होत असतांना ते कधीच त्याविषयी सांगत नसत.

२ उ. मुलाला पूर्णवेळ साधना करण्यासाठी पाठिंबा देणे : मी पूर्णवेळ साधना करण्याचा निर्णय घेतल्यानंतर बाबांनी मला पाठिंबा दिला. त्यानंतर १२ वर्षे बाबांनीच माझ्या मुलांचा सांभाळ केला. त्यांनी उतारवयात हे सर्व माझ्या साधनेसाठी केले. त्यामुळे मला बाहेरगावी जाऊन सेवा करता आली. बाबा आमच्या कुटुंबियांसाठी एक आधारवड होते.

३. शेवटच्या आजारपणाच्या कालावधीत वडिलांना आलेल्या अनुभूती

३ अ. रात्रीच्या वेळी अनिष्ट शक्तींनी दृश्ये दाखवून त्रास देणे आणि दत्ताचा नामजप केल्यावर दृश्ये दिसण्याचे प्रमाण न्यून होणे : ३ ते ८.७.२०२१ या कालावधीत रात्रीच्या वेळी अनिष्ट शक्ती वेगवेगळी दृश्ये दाखवून बाबांना त्रास देत असत. त्यामुळे त्यांची झोप होत नसे. त्यांना काही वेळा भीती वाटायची. ते आम्हाला सांगायचे, ‘‘पांढर्‍या वस्त्रातील ८ – १० अनिष्ट शक्ती मला त्रास देतात. त्या शक्ती एकमेकींना माझ्याविषयी म्हणतात, ‘यांचे पाय बांधा. यांना घेऊन जा’ आणि काही शक्ती हातात शस्त्र घेऊन मला भीती दाखवत असतात.’’ त्या वेळी मी त्यांना दत्ताचा नामजप करायला सांगायचो. तो नामजप केल्यावर त्यांना दृश्ये दिसण्याचे प्रमाण न्यून झाले.

३ आ. अनिष्ट शक्तींचा त्रास होत असतांना परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा केल्यावर त्रास न्यून होणे : ७ आणि ८.७.२०२१ या दिवशी बाबांना अनिष्ट शक्तींचा त्रास झाला. त्या वेळी बाबांनी वाईट शक्तींना सांगितले, ‘तुम्ही मला काहीच करू शकणार नाही. परात्पर गुरु डॉक्टर माझ्या समवेत आहेत.’ बाबांना त्रास होत असतांना त्यांनी परात्पर गुरु डॉक्टरांचा धावा केल्यावर त्यांचा त्रास न्यून होत असे.

३ इ. अर्धांगवायूचा झटका येणे आणि दुसर्‍या दिवशी बरे वाटणे : ८.७.२०२१ या दिवशी बाबांना अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यांच्या शरिराची डावी बाजू लुळी पडली; मात्र ९.७.२०२१ या दिवशी त्यांचे तोंड आपोआप सरळ झाले आणि त्यांना डाव्या हाता-पायाची हालचाल करता येऊ लागली.

३ ई. प.पू. भक्तराज महाराज आणि परात्पर गुरुदेव यांचे दर्शन होणे : ९.७.२०२१ या दिवशी बाबांना पुष्कळ शारीरिक त्रास होत होता. त्यांची हाडे दुखत होती. त्यांना एका कुशीवरून दुसर्‍या कुशीवर वळतांना पुष्कळ त्रास होत होता. त्या वेळी त्यांना ‘प.पू. भक्तराज महाराज आणि हातात ‘सुटकेस’ घेतलेले परात्पर गुरु डॉक्टर त्यांच्यासमोर उभे आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले.

३ उ. वडिलांनी ‘मला त्रास होत असल्याने लवकर घेऊन चला’, असे परात्पर गुरुदेवांना सूक्ष्मातून सांगितल्यावर त्यांनी ‘४ – ५ दिवसांनी तुम्हाला नेतो’, असे सांगणे : परात्पर गुरु डॉक्टर आणि बाबा यांच्यात सूक्ष्मातून पुढीलप्रमाणे संभाषण झाले.

परात्पर गुरु डॉ. आठवले : बाबा, पुष्कळ त्रास होतो का ?

बाबा : अंग पुष्कळ दुखते आणि हाडेही दुखतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले : बाबा, तुम्हाला एक इंजेक्शन देतो.

बाबा : कुठे देणार ? आता केवळ हाडेच राहिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले : बाबा, खुब्याला देणार.

(त्यांनी बाबांच्या उजव्या खुब्याला इंजेक्शन दिले.)

बाबा : मला पुष्कळ त्रास होत आहे. मला घेऊन चला. आता मला काही नको.

परात्पर गुरु डॉ. आठवले : अजून ४ – ५ दिवसांचा कालावधी आहे. नंतर घेऊन जातो.

त्यानंतर बाबांना जाग आली. ही अनुभूती आल्यानंतर बाबांचा त्रास थोडा न्यून झाला.

४. वडिलांचे निधन होण्यापूर्वी जाणवलेली सूत्रे

४ अ. निधन होण्यापूर्वी ३ दिवस दृष्टी त्राटक केल्याप्रमाणे स्थिर होणे : १०.७.२०२१ या दिवशी सकाळी १० वाजल्यापासून १२.७.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.२० वाजेपर्यंत बाबांची दृष्टी त्राटक केल्याप्रमाणे स्थिर होती. त्यांच्या डोळ्यांच्या पापण्यांची जराही उघडझाप होत नव्हती. ते केवळ मान हालवून आणि हातवारे करून सुचवायचे. त्यांचे बोलणे बंद झाले होते.

४ आ. ‘या कालावधीत देवाने त्राटकाच्या माध्यमातून बाबांची साधना करवून घेतली’, असे मला जाणवले.

५. वडिलांचे निधन

१२.७.२०२१ या दिवशी उत्तररात्री २.२० वाजता (म्हणजे १३.७.२०२१ या दिवशी) त्यांचा श्वासोच्छ्वास थांबला आणि त्यांचे डोळे आपोआप झाकले गेले.

६. प्रार्थना

‘बाबांच्या पुढील प्रवासातील अडचणी दूर होऊन त्यांना भगवंताच्या चरणी स्थान मिळू दे’, अशी मी गुरुमाऊलीच्या चरणी प्रार्थना करतो.

‘प.पू. गुरुमाऊली, तुमच्या प्रेरणेमुळे मी ही सूत्रे लिहू शकलो. ‘तुमची कृपा सदैव आमच्यावर असू दे’, अशी आपल्या कोमल चरणी प्रार्थना !’

– श्री. यल्लाप्पा सातेरी पाटील (धाकटा मुलगा), नंदिहळ्ळी, जिल्हा बेळगाव. (२३.७.२०२१)

या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषि मुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रति बंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.