साडेचार मासांच्या अखंड सेवेनंतर जिल्हा क्रीडा संकुल येथील ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर’ बंद ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी, सांगली

सांगली, १ सप्टेंबर – मिरज येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे उभारण्यात आलेले १५६ खाटांचे ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर’ १५ एप्रिलपासून अखंडपणे रुग्णांच्या सेवेत कार्यरत होते. या केंद्रात भरती झालेल्या २ सहस्र ४५ रुग्णांवर उपचार करून त्यातील १ सहस्र ७८६ रुग्ण पूर्ण बरे झाले. यात अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचाही समावेश होता. १३९ रुग्णांना अन्य ठिकाणी पाठवण्यात आले, तर १०८ जणांचा मृत्यू झाला. साडेचार मासांच्या अखंड सेवेनंतर जिल्हा क्रीडा संकुल येथील ‘डेडिकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर’ आता बंद करण्यात येत असून येत्या काळात कोरोनाचे रुग्ण वाढल्यास पुन्हा हे केंद्र चालू करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली.