सांगली, १ सप्टेंबर (वार्ता.) – रिक्शाव्यवसाय सुरळीत होईपर्यंत रिक्शाचालकांना कर्ज परतफेड हप्त्यास मुदतवाढ मिळावी, तसेच व्याज आकारण्यात येऊ नये. अधिकोष आस्थापनांनी कर्जफेडीसाठी रिक्शा जप्त केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी रिक्शा व्यवसाय बचाव कृती समितीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना दिली आहे.
जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात रिक्शाव्यवसाय पूर्णत: कोलमडलेला असून रिक्शाचालकांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अत्यंत अवघड झाले आहे. आता दळणवळण बंदी काही प्रमाणात शिथिल झाल्यावर खासगी अधिकोष आस्थापनांनी रिक्शाचालकांना थकित हप्ते भरण्यासाठी तगादा लावला आहे. याच्या वसुलीसाठी गुंडही पाठवण्यात येत आहेत. या त्रासास कंटाळून गेल्या दोन मासांत ३ रिक्शाचालकांनी आत्महत्या केली आहे. तरी याची जिल्हाधिकार्यांनी गंभीर नोंद घ्यावी.
या वेळी माजी आमदार नितीन शिंदे, महेश चौगुले, राजू रसाळ, शिवाजी जाधव, प्रकाश चव्हाण यांसह रिक्शा संघटना यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.