‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ या उपक्रमाचे पू. रमानंद गौडा यांचा हस्ते उद्घाटन
मंगळुरू (कर्नाटक) १ सप्टेंबर (वार्ता.) – श्रीमद्भगवद्गीता, महाभारत आदी धर्मग्रंथ ईश्वरी वाणीने साकार झाले आहेत; म्हणून त्यात चैतन्य आहे. तसेच सनातनचे ग्रंथही ईश्वरी संकल्पाने साकार झाले आहेत. हे स्वयंभू चैतन्याचे स्रोत असून त्यांचे अध्ययन करणार्यांनी ग्रंथांतून सांगितलेले मार्गदर्शन कृतीत आणले, तर ते साधक, शिष्य आणि पुढे संतही होऊ शकतात. या ग्रंथांमुळे घरात सात्त्विक स्पंदने निर्माण होऊन वास्तूशुद्धीही होते. या ग्रंथांच्या अध्ययनाने अंतर्मनात साधनेचा संस्कार होतो. याचे अध्ययन करून कृतीत आणणे ही साधनाच आहे. यामुळे उद्धार होणार आहे. वेद समान असलेले हे ग्रंथ घरोघरी पोचवून प्रत्येक जिवाचा उद्धार करूया, असे आवाहन सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांनी येथे केले. येथे सकाळी ७.३० वाजता ‘सनातन धर्माचे ज्ञानशक्ती प्रसार अभियान’ या अभियानाचे ‘ऑनलाईन’ उद्घाटन करण्यात आले. या वेळी पू. रमानंद गौडा बोलत होते. हा कार्यक्रम सुमारे ६०० हून अधिक लोकांनी पाहिला. शंखनादाने प्रारंभ झालेल्या या कार्यक्रमात पू. रमानंद गौडा यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून आणि दीपप्रज्वलन करून अभियानाचे उद्घाटन करण्यात आले. सनातनची ग्रंथसंपदा घरोघरी पोचवण्याच्या दृष्टीने १ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सर्व साधक, धर्मप्रेमी आणि हितचिंतक सहभागी होणार आहेत. तसेच सामाजिक माध्यमांद्वारेही व्यापक प्रसार करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रारंभ झाल्यावर अर्ध्या घंट्यातच ग्रंथांची ‘ऑनलाईन’ मागणी येण्यास प्रारंभ झाला.
पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनातील ठळक सूत्रे
१. शाळेत असतांना ‘ग्रंथच गुरु आहेत’ असे शिकत होतो. तेव्हा मला याचा अर्थ कळला नाही. सनातनचा ग्रंथ वाचल्यावर, त्यातून ज्ञान मिळाल्यावर ‘ग्रंथच गुरु आहेत’ याची प्रकर्षाने जाणीव झाली.
२. सनातनचे ग्रंथ ज्ञानभंडार आहेत, ज्ञानाचे सागर आहेत; म्हणून आमचे गुरु परात्पर गुरु डॉ. आठवले हे ज्ञानगुरु आहेत. ‘ज्ञान कृतीत आणले, आचरणात आणले, तर आपल्याला मोक्षप्राप्ती होईल’, हे आपल्याला प.पू. गुरुदेवांनीच शिकवले आहे. म्हणजे तेच आम्हा साधकांना मोक्षापर्यंत नेत आहेत. तेच मोक्षगुरु आहेत.
३. परात्पर गुरुदेवांनी दिलेले ज्ञान आपल्याला समाजाला द्यायचे आहे. या ज्ञानप्रसाराची सेवा म्हणजे काळानुसार मोठी समष्टी साधनाच आहे. या वेळी समाजात ज्ञानशक्तीचा प्रसार करणे गुरुदेवांना अपेक्षित आहे.
४. या अभियानात आपण सर्वांनी तळमळीने भाग घेऊया. ज्ञानरूपी ग्रंथ घरोघरी पोचवूया. यातून आपली साधना होणार, तसेच समाजातील जिज्ञासू जिवांची साधना होवो; म्हणून प्रयत्न करूया.