पंजशीर प्रांतावर आक्रमण करणार्‍या तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार ! – नॉर्दर्न अलायन्सचा दावा

बंदिवान तालिबान आतंकवादी

काबुल (अफगाणिस्तान) – अफगाणिस्तानचा पंजशीर प्रांत कह्यात घेण्यासाठी तालिबानने खावक येथे केलेल्या आक्रमणामध्ये तालिबानचेच ३५० आतंकवादी ठार झाल्याचा, तसेच ४० आतंकवाद्यांना पकडल्याचा दावा नॉर्दर्न अलायन्सने (तालिबानच्या विरोधात स्थापन करण्यात आलेला ‘उत्तरी मित्रपक्ष’) केला आहे. तालिबानींचे हे आक्रमण परतवून लावल्यानंतर नॉर्दर्न अलायन्सच्या सैनिकांनी तालिबानी वापरत असलेले अमेरिकी  सैन्याची वाहने आणि शस्त्रे मिळवली आहेत. गेल्या २ दिवसांपासून तालिबानने पंजशीर येथे आक्रमण चालू केले आहे. तालिबानने जवळपास पूर्ण अफगाणिस्तानवर नियंत्रण मिळवले असले, तरी अद्याप त्याला पंजशीर प्रांतावर नियंत्रण मिळवता आलेले नाही. नॉर्दर्न अलायन्सच्या अहमद मसूद यांच्या नेतृत्वाखाली तालिबानच्या विरोधात संघर्ष केला जात आहे.

अफगाणिस्तानचे माजी उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह आणि अफगाणिस्तान सैन्यातील काही अधिकारी अन् सैनिक येथे त्यांना साहाय्य करत आहेत.