गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजनासाठी सावंतवाडी नगरपरिषदेची २ सप्टेंबरला बैठक

सावंतवाडी नगरपरिषद

सावंतवाडी – सावंतवाडी शहरात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियोजन करण्यासाठी २ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११ वाजता नगरपरिषदेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली. याविषयी नगराध्यक्षांच्या दालनात पत्रकारांना माहिती देतांना संजू परब म्हणाले, ‘‘उत्सवाच्या काळात वाढणारी वर्दळ, विक्रेत्यांची वाढणारी संख्या, स्थानिक व्यापार्‍यांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच वाहतूक कोंडी होऊ नये आदी विषयांवर या वेळी चर्चा होणार आहे. यावर्षी शहरातील मोती तलावात श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ३ नौका खरेदी करण्यात आल्या आहेत. यापूर्वी तराफ्याच्या साहाय्याने श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जात असे. त्यामुळे नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत असे. यावर्षी इंजिन असलेल्या नौका आणल्याने तलावात मध्यवर्ती भागात जाऊन मूर्तींचे विसर्जन करणे शक्य होणार आहे. भविष्यात या नौकांच्या माध्यमातून तलावात नौकाविहार चालू करण्यात येणार आहे. त्यामुळे नगरपरिषदेला उत्पन्न वाढीसाठी साहाय्य होणार आहे.’’

सावंतवाडीत चालू होणार मुंबई विद्यापिठाचे उपकेंद्र !

शहरातील जिमखाना येथील स्व. बाळासाहेब ठाकरे ज्ञानप्रबोधिनीच्या ठिकाणी येत्या मासात मुंबई विद्यापिठाचे उपकेंद्र चालू करण्यात येणार आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना विद्यापिठाशी संबंधित कामांसाठी वारंवार मुंबईला जावे लागणार नाही. सर्वांच्या सहकार्यातून हे केंद्र चालू होणार असून विद्यार्थ्यांनी याचा अधिकाधिक लाभ करून घ्यावा, असे आवाहन नगराध्यक्ष संजू परब यांनी केले आहे.