सिंधुदुर्ग – अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करतांना ठाणे महानगरपालिकेच्या साहाय्यक उपायुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर एका परप्रांतीय व्यावसायिकाने धारदार शस्त्राने आक्रमण केले. यामध्ये पिंपळे गंभीर घायाळ झाल्या आहेत. या घटनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत. सावंतवाडी, मालवण, वेंगुर्ले आणि कणकवली नगरपंचायत आणि नगरपरिषद यांचे अधिकारी अन् कर्मचारी यांनी या घटनेचा निषेध म्हणून अत्यावश्यक कामे वगळता ‘कामबंद’ आंदोलन चालू केले आहे. या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारावर शीघ्र गतीने खटला चालवून कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. याविषयीचे निवेदन संबंधित नगराध्यक्ष, तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले.