युवतीचा खून केल्याच्या प्रकरणी रशियाचा नागरिक पोलिसांच्या कह्यात

शिवोली येथे रशियातील युवतीच्या मूत्यू प्रकरणाला कलाटणी

प्रतिकात्मक छायाचित्र

पणजी, २८ ऑगस्ट (वार्ता.) – रशियाची नागरिक एकाटॅरिना टिटोवा (वय ३४ वर्षे) हिचा काही दिवसांपूर्वी शिवोली येथे एका घरात मृत्यू झाला होता. एकाटॅरिना टिटोवा हिचा खाटेवरच मृत्यू झाल्याचे आढळ्याने पोलिसांनी हे प्रकरण प्रारंभी अनैसर्गिक मृत्यू म्हणून नोंद केले होते; मात्र पोलिसांना पुढील अन्वेषणात एकाटॅरिना टिटोवा हिचा नाक आणि तोंड दाबून खून करण्यात आल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाच्या अन्वेषणाला वेगळीच कलाटणी मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी एकाटॅरिना टिटोवा हिचा मित्र तथा रशियाचा नागरिक डेनिस क्रूयचॉकोए (वय ४७ वर्षे) याला कह्यात घेतले आहे.

गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असल्याने विद्यमान शासन विसर्जित करा ! – दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले की, गोव्यात महिला आणि युवती यापूर्वी सुरक्षित होत्या. जांबावलीच्या गुलालाच्या वेळी महिला किंवा युवती गर्दीतून जात असतांना त्यांच्या अंगाला रंग लावण्यास कुणीही धजावत नसत. गोव्याचे हे उदाहरण आपण सर्वत्र देत असतो, तसेच रात्री उशिरापर्यंत सार्वजनिक ठिकाणी डान्स चालायचा; मात्र कधीच गैरप्रकार झालेला नाही. आता या शासन काळात महिला अथवा युवती यांच्यावर अत्याचार होत असल्याच्या अनेक घटना घडत आहेत. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. लोकांना सुरक्षा पुरवणे हे शासनाचे प्राथमिक दायित्व आहे. नागरिकांना सुरक्षा न पुरवणारे विद्यमान शासन सत्तेवर रहाण्याच्या पात्रतेचे नाही. शासनाने तातडीने राज्यात कायदा आणि सुव्यवस्था प्रस्थापित करावी अन्यथा त्यांना सत्तेवर रहाण्याचा अधिकार नाही. राज्यपालांनी हे शासन विसर्जित करावे, अशी मागणी शेवटी दिगंबर कामत यांनी केली.