पोलादनिर्मिती उद्योग समुहाच्या गोवा आणि महाराष्ट्र येथील कार्यालयांवर आयकर खात्याच्या धाडी बेहिशोबी मालमत्ता कह्यात

पणजी, २८ ऑगस्ट (वार्ता.) – आयकर खात्याने एका प्रथितयश पोलाद (स्टील) निर्मिती उद्योग समुहाच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यांतील कार्यालयांवर धाडी टाकून सुमारे १७५ कोटी ५० लक्ष रुपये किमतीची बेहिशोबी मालमत्ता कह्यात घेतली आहे. यामध्ये रोकड, सोन्याच्या वस्तू आदींचा समावेश आहे. हा उद्योग समूह प्रसिद्ध असून त्याचा नाशिक, अहमदनगर, पुणे आणि गोवा येथे व्यवसाय चालतो. आयकर खात्याने या समुहाच्या ४४ कार्यालयांवर २५ ऑगस्टपासून धाडी टाकल्या. ‘वस्तू आणि सेवा कर’ विभागाच्या पुणे कार्यालयाकडून सक्रीय पाठिंबा लाभल्याने आयकर खात्याने हे धाडसत्र आरंभले.

आयकर खात्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा उद्योग समूह भंगार आणि ‘स्पॉन्ज आयर्न’ खरेदी केल्याची खोटी माहिती देत होता. या समुहाच्या बनावट ‘इलेक्ट्रॉनिक-वे बिल्स’ शोधण्यासाठी ‘व्हेईकल मूव्हमेंट ट्रॅकींग ॲप’चा वापर करण्यात आला. या धाडसत्रात या प्रकल्पाने १६० कोटी रुपयांची बनावट खरेदी केल्याचे उघड झाले, तसेच ३ कोटी ५० लक्ष रुपये किमतीच्या मालाची कमतरता असल्याची खोटी माहिती दिल्याचे आणि ४ कोटी रुपयांचा अतिरिक्त साठा साठवून ठेवल्याचे या धाडसत्रात उघड झाले. भूमी खरेदीमध्येही बेहिशोबी मालमत्ता गुंतवणे, ३ कोटी रुपये बेहिशोबी रोकड, ५ कोटी २० लक्ष रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज आणि १ कोटी ३४ लक्ष रुपये किमतीचे १९४ किलो चांदी या वेळी सापडली.