नामजपाविषयी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’ ने ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे केलेली वैज्ञानिक चाचणी
‘१४ मे २०२१ आणि २० जून २०२१ या दिवशीच्या दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘निर्विचार’, ‘ॐ निर्विचार’ आणि ‘श्री निर्विचाराय नमः’ या नामजपाच्या संदर्भातील चौकट प्रकाशित करून त्याची प्रथम ओळख करून देण्यात आली होती. त्यानुसार साधकांनी हा नामजप करण्यास प्रारंभ केला आहे. साधकांना ‘निर्विचार’ हा नामजप किंवा तो नामजप करणे कठीण जात असल्यास ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप काही मास (महिने) प्रतिदिन अधिकाधिक वेळ करावा. कालांतराने हा नामजप करणे जमू लागल्यास, हाच नामजप पुढे सतत चालू ठेवावा. ‘निर्विचार’ किंवा ‘श्री निर्विचाराय नमः’ हा नामजप ‘गुरुकृपायोगानुसार साधनामार्गा’तील शेवटचा नामजप आहे !’ (संदर्भ : www.sanatan.org/mr/a/79145.html)
‘निर्विचार’ नामजपाचा साधक आणि संत यांच्यावर होणारा परिणाम विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.)’ या उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. या चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे.
१. चाचणीतील निरीक्षणांचे विवेचन
या चाचणीत तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले ४ साधक, तीव्र आध्यात्मिक त्रास असलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक आध्यात्मिक पातळीचे ५ साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले ३ साधक, आध्यात्मिक त्रास नसलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळीचे ४ साधक, १ दैवी बालिका आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, असे एकूण १७ साधक अन् १ संत सहभागी झाले. चाचणीतील साधक आणि संत यांना १७ ते २३ जून २०२१ या कालावधीत प्रतिदिन ‘निर्विचार’ हा नामजप १० मिनिटे ऐकवण्यात आला.
१ अ. चाचणीतील साधकांवर ‘निर्विचार’ नामजपाचा सकारात्मक परिणाम होणे : चाचणीतील साधकांवर ‘निर्विचार’ नामजपाचे झालेले परिणाम दर्शवणारी सारणी पुढे दिली आहे.
१ आ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी ‘निर्विचार’ नामजप ऐकल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा १५ ते १८ टक्क्यांनी वाढल्याचे ‘यू.ए.एस्.’ निरीक्षणात आढळणे : या चाचणीत १८, २० आणि २३ जून या दिवशी ‘निर्विचार’ नामजप ऐकण्यापूर्वी आणि १० मिनिटे ऐकल्यानंतर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची छायाचित्रे काढण्यात आली. या सर्व छायाचित्रांची ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचणी करण्यात आली. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्यामध्ये आरंभीही पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा होती आणि नामजप ऐकल्यानंतर त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा अनुमाने १५ ते १८ टक्क्यांनी वाढली. हे पुढील सारणीतून लक्षात येते.
१ इ. चाचणीतील साधक आणि संत यांच्यावर ‘निर्विचार’ नामजपाचा परिणाम ४ दिवस टिकून रहाणे : २३.६.२०२१ या दिवशी नामजपाचा प्रयोग संपल्यावर दुसर्या दिवसापासून (२४.६.२०२१ पासून) प्रतिदिन साधक आणि संत त्यांच्या मूळ नोंदीला (Baseline Reading) येईपर्यंत त्यांची उपकरणाद्वारे निरीक्षणे करण्यात आली. या कालावधीत त्यांना हा नामजप ऐकवण्यात आलेला नव्हता. चाचणीतील सर्व साधक आणि संत २७.६.२०२१ या दिवशी त्यांच्या मूळ नोंदीवर आले. यातून चाचणीतील साधक आणि संत यांच्यावर ‘निर्विचार’ नामजपाचा परिणाम सुमारे ४ दिवस टिकला, असे लक्षात येते.
२. ‘निर्विचार’ नामजपाच्या संदर्भातील महत्त्वाची सूत्रे
‘निर्विचार’ नामजप ऐकल्याने चाचणीतील सर्वच साधकांवर सकारात्मक परिणाम झाले असले, तरी हा नामजप कुणी करावा आणि कुणी करू नये, तसेच किती वेळ करावा, हे समजण्यासाठी पुढील सूत्रे लक्षात घ्यावीत.
२ अ. आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांनी ‘निर्विचार’ हा नामजप करू नये; त्यांनी आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी सांगितलेलेच नामजप करावेत : ‘निर्विचार’ हा नामजप निर्गुणाकडे घेऊन जाणारा आहे. आध्यात्मिक त्रास असणारा साधक हे नामजप करू लागल्यास त्याला वाईट शक्तींकडून विरोध होऊ शकतो. हा विरोध तीव्र स्वरूपाचा झाला, तर त्रास असणार्या साधकाच्या त्रासाची तीव्रता वाढू शकते आणि त्यासाठी संतांना नामजप करण्यासाठी वेळ द्यावा लागू शकतो. त्यामुळे वाईट शक्तींचा तीव्र, मध्यम आणि मंद त्रास असलेल्या साधकांनी त्यांना आध्यात्मिक स्तरावरील उपायांसाठी सांगितलेलेच नामजप करावेत. या साधकांसाठी वाईट शक्तींचा त्रास दूर होणेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे त्यांनी उपायांचा कालावधी पूर्ण झाल्यावरही उपायांमध्ये आलेल्या नामजपांपैकी एखादा नामजप उर्वरित वेळी येता-जाता करावा.’ (संदर्भ : www.sanatan.org/mr/a/79145.html)
२ आ. आध्यात्मिक त्रास असणारे अन् ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांनी ‘निर्विचार’ हा नामजप त्यांना असणार्या जपाच्या एकूण वेळेपैकी २० टक्के वेळ करावा : ‘आध्यात्मिक त्रास असणारे अन् ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक आध्यात्मिक पातळी असणारे साधक ‘निर्विचार’ हा नामजप त्यांना असणार्या जपाच्या एकूण वेळेपैकी २० टक्के वेळ करू शकतात.’ (संदर्भ : www.sanatan.org/mr/a/79145.html)
२ इ. आध्यात्मिक त्रास नसणार्या साधकांनी ‘निर्विचार’ हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा : ‘निर्विचार’ हा नामजप ‘निर्गुण’ स्थितीला नेणारा आहे. त्यामुळे कुलदेवतेचा नामजप करणार्या साधकांना किंवा ६० टक्क्यांपेक्षा कमी आध्यात्मिक पातळीच्या साधकांना हा नामजप करणे कठीण होऊ शकते. यासाठी त्यांनी त्यांच्या नेहमीच्या जपाच्या बरोबर हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा. हा नामजप करणे जमू लागल्यास तो निरंतर करावा; कारण शेवटी साधनेच्या पुढच्या टप्प्यात जाऊन पूर्णवेळ हाच नामजप करावयाचा असतो.’ (संदर्भ : www.sanatan.org/mr/a/79145.html)
२ ई. आध्यात्मिक त्रास नसणारे अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांनी ‘निर्विचार’ हाच नामजप करावा : ‘निर्विचार’ हा जप होण्यासाठी साधकाची आध्यात्मिक पातळी कमीतकमी ६० टक्के असणे, म्हणजे त्याच्या मनोलयाचा आरंभ होणे आवश्यक आहे. त्यानंतर तो साधक निर्विचार स्थितीला जाऊ शकतो. ‘निर्विचार’ हा नामजप ‘निर्गुण’ स्थितीला नेणारा असल्याने आध्यात्मिक त्रास नसलेले अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांनी ‘निर्विचार’ हाच नामजप करावा.’ (संदर्भ : www.sanatan.org/mr/a/79145.html)
३. ‘निर्विचार’ नामजपाच्या प्रयोगाचा निष्कर्ष
‘निर्विचार’ नामजपाच्या संदर्भात केलेल्या संशोधनात्मक चाचणीतून ‘निर्विचार’ हा जप आध्यात्मिक त्रास नसणारे अन् ६० टक्क्यांपेक्षा अधिक पातळी असलेल्या साधकांसाठी उपयोगी पडतात, हे लक्षात येते. यावरून याची एकूणच परिणामकारकता लक्षात येते. यासाठी साधकांनी नेहमीच्या नामजपासह हा नामजप करण्याचा प्रयत्न करावा. त्याचा सराव झाला की, पुढे हाच जप चालू ठेवावा.
कुलदेवतेच्या सगुण उपासनेच्या नामजपापासून गुरुकृपायोगानुसार साधनामार्गातील शेवटच्या ‘निर्विचार’ या निर्गुण स्थितीला घेऊन जाणार्या नामजपापर्यंत साधकांचा साधनाप्रवास करवून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२१.८.२०२१)
ई-मेल : [email protected]