संपादकीय
|
२६ ऑगस्ट या दिवशी परराष्ट्रमंत्री एस्. जयशंकर यांनी तालिबान प्रश्नावर दुसर्यांदा सर्वपक्षीय बैठक बोलावली आणि तालिबानच्या संदर्भात ‘थांबा आणि वाट पहा’ या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. विरोधी पक्षांनीही त्याला पाठिंबा दिला आहे. ‘या प्रकरणी भारताने खरेतर आक्रमक आणि कणखर भूमिका घेणे अपेक्षित आहे’, असे येथील देशप्रेमींना वाटते आणि ते चूक नव्हे; परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रश्न हाताळतांना अनेक अंगांनी विचार करून अत्यंत सावध भूमिका घेऊन वागावे लागते. अफगाणप्रश्नी अर्थातच भारत अन्य देशांच्या संपर्कात आहे आणि भारताकडे सक्षम सैन्यही आहे; परंतु आतंकवाद्यांशी लढा देतांना ‘युद्ध आणि सामान्यांची जीवितहानी टाळून त्यांच्यावर कशी मात करता येईल’, असा भारताचा प्रयत्न असतो. तालिबान पूर्वी इतकाच आक्रमक आणि हिंसक आहे; मात्र या वेळी तो स्वतःची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करत आहे. अशा धूर्त तालिबानच्या विरोधात भारताने सतर्क रहाणे आवश्यक !
तालिबान्यांची रणनीती !
‘दिवसेंदिवस प्रबळ होत चाललेल्या भारतीय सैन्य सामर्थ्यापुढे थेट निभाव लागू शकणार नाही’, हे पाकप्रमाणेच तालिबानही जाणतो. त्यामुळे पाकप्रमाणे शीतयुद्ध करणे, भारतात आतंकवादी घुसवून भारताला अस्थिर करणे, ‘तालिबानी विचारसरणीच्या भारतातील प्रवृत्ती कशा वाढतील’, हे पाहून त्याला खतपाणी घालणे, बॉम्बस्फोट करणे अशा गोष्टी तालिबान करत रहाणार. ‘भारतातील तालिबानी प्रवृत्ती वाढवणे’, हे तालिबानचे सध्याचे मुख्य शस्त्र आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने नुकतेच केलेले ‘भारत हा महत्त्वाचा देश आहे’, हे विधान बरेच काही सांगून जाते. ‘भारताने पूर्वीप्रमाणेच अफगाणिस्तानशी राजकीय संबंध ठेवावेत’, असेही विधान तालिबानच्या प्रवक्त्याने केले आहे. भारताने आतापर्यंत ३ अब्ज डॉलरपेक्षा अधिक पैसे अफगाणिस्तानमधील योजनांवर व्यय केले आहेत. तालिबान्यांना भारताचा हा पैसा आणि सुविधा हव्या आहेत. क्रूर तालिबान्यांनी अफगाण कह्यात घेतल्यावर ‘आताही भारताने तीच भूमिका ठेवावी’, असे वर तोंड करून सांगायला तालिबानला काही वाटत नाही. तालिबान्यांनी ‘अल्-कायदा आता अस्तित्वात नाही’, असा प्रसार करायला आरंभ केला आहे. जरी ‘अल्-कायदा’ संपत आली, तरी अफगाण आणि पाक येथे शेकडो आतंकवादी संघटना क्रियाशील आहेत, हे तालिबान का सांगत नाही ? काबुल विमानतळावर झालेल्या स्फोटाचे दायित्व ‘आय.एस्.आय.एस्.-खुरासान’ संघटनेने घेतले आहे आणि ‘खुरासन’ची निर्मिती हेच त्यांचे ध्येय आहे. या खुरासान भूप्रदेशात राजस्थान, गुजरातपर्यंतचा भूप्रदेश समाविष्ट आहे. सत्तेवर आल्यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिमा सुधारण्यासाठी तालिबानने सांगितले ‘महिलांवर अत्याचार होणार नाहीत.’ ते किती तद्दन खोटे होते, हे अनेक ‘व्हिडिओं’मधून समोर आले. आता ‘तालिबान्यांना महिलांशी कसे वागावे हे शिकवले जाईल’, असे हास्यास्पद विधान त्यांनी केले आहे. तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने ‘भारताने काश्मीरप्रश्नी सकारात्मक भूमिका ठेवावी’, असे सांगूनही त्याने एकप्रकारे भारताला धमकीच दिली आहे. एक एक करत जसे अफगाणिस्तान गिळंकृत केले, तसे ‘खुरासान’च्या ध्येयाने वेडे झालेल्या तालिबान्यांना पुढे पुढे यायला वेळ लागणार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी ‘पाकच्या भूमीपासून तालिबान्यांना दूर ठेवा; कारण पाकची अण्वस्त्रे तालिबान्यांच्या कह्यात जाऊ शकतात’, असे म्हटले आहे; मात्र पाक आणि त्याचे पंतप्रधान यांची सध्याची भूमिका पहाता ‘पाक स्वतःहूनच ही अण्वस्त्रे तालिबान्यांना द्यायला कमी करणार नाही’, असे कुणाला वाटले, तरी ती अतिशयोक्ती होणार नाही. अमेरिकेने अफगाणमधून सैन्य मागे घेण्यापूर्वी झालेल्या शांतता करारात अफगाणीस्तानला इच्छा नसतांना अमेरिकेच्या दबावामुळे तालिबानचे अत्यंत क्रूर ५०० आतंकवादी कारागृहातून सोडावे लागले. हा एकप्रकारे तालिबानचा विजयच होता. मागील वर्षी म्हणजे वर्ष २०२० मध्ये तालिबानने तह करण्यासाठी एक आंतराष्ट्रीय बैठक बोलावली. याचा परिणाम असा झाला की, एकप्रकारे तालिबानला परत एकदा आंतरराष्ट्रीय स्थान प्राप्त झाले. ‘तालिबानचे म्हणणे कुणीतरी जगातील देश ऐकून घेत आहेत’, असे चित्र निर्माण झाले. हाही तालिबानच्या धूर्त रणनीतीचाच एक भाग म्हणावा लागेल.
भारतासमोरील आव्हाने
उद्या तालिबानच्या प्रभावामुळे काश्मीरमधील आतंकवादी कारवाया वाढल्या आणि त्याने चर्चेचे आवाहन केले, तर ‘भारताने आतापर्यंत जशा पाकशी चर्चा चालू ठेवल्या, तसे काही होऊ नये’, अशी अपेक्षा आहे. भारताने सध्या घेतलेली सावध भूमिका सर्वथा योग्यच आहे. अफगाणिस्तानमधून भारतीय वंशाच्या नागरिकांना परत आणण्यासाठी भारताने दाखवलेली तत्परताही चांगली आहे; परंतु तालिबान्यांचे संकट केवळ एवढ्यापुरते मर्यादित नाही. ‘तालिबानच्या सध्याच्या विजयाने आतंकवादी संघटनांचा उत्साह वाढला आहे’, हे महत्त्वाचे आहे आणि भारताच्या दृष्टीने तो खरा मोठा धोका आहे. त्यात पाक आणि चीन यांची तालिबानला असलेली फूस भारतासाठी अधिक मोठी डोकेदुखी आहे. यात भारताच्या मुत्सद्देगिरीची खरी कसोटी लागणार आहे. ‘अफगाणींना आश्रय द्यायचा किंवा नाही ?’, ‘इथे घुसलेले अफगाणी भारतविरोधी कारवाया करत आहेत कि नाही’, याकडे लक्ष ठेवणे, या निमित्ताने गरळओक करणारे धर्मांध काश्मिरी, साम्यवादी, मानवतावादी आणि देशद्रोही यांच्यावर नियंत्रण ठेवणे, पाक आणि चीन यांच्या तालिबानमधील कारवायांवर लक्ष ठेवणे, येथील आतंकवादी कारवाया कायमच्या नष्ट करणे, अशी अनेक आव्हाने भारतासमोर आहेत. भारतावर ईश्वराची कृपा आहे. त्यामुळे भारत ही आव्हाने लिलया पेलेल अशी अपेक्षा करूया !