मये मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाकडून २२० कोटी रुपयांची तरतूद ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

पणजी, २६ ऑगस्ट (वार्ता.) – मये मतदारसंघात पायाभूत सुविधांच्या विकासासाठी शासनाने २२० कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत मये मतदारसंघाच्या दौर्‍याच्या वेळी शिरगाव येथे एका कार्यक्रमात बोलत होते. या वेळी मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांचीही उपस्थिती होती. मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘सरकारसमोर अनेक समस्या आहेत आणि मला मिळालेल्या अडीच वर्षांत मी अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे. शासनाच्या ‘स्वयंपूर्ण गोवा’ बनवण्याच्या योजनेला सर्वांनी पाठिंबा देणे आवश्यक आहे.’’

आमदार प्रवीण झांट्ये यांनी या वेळी मतदारसंघात २५ कोटी रुपयांची कामे पूर्ण केल्याचे सांगितले. कार्यक्रमात प्रारंभी ग्रामस्थांनी शिरगाव येथे श्री लईराईदेवीच्या जत्रेच्या वेळी भाविकांसाठी शौचालय बांधणे, गावातील भातशेती पुनर्जीवित करण्यासाठी प्रयत्न करणे, खेळाच्या मैदानाची उभारणी आदी सूत्रांविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली.

राज्यातील खाणव्यवसायाला पुढील ३ मासांत प्रारंभ होणार

राज्यात खाणव्यवसायाला पुढील ३ मासांत प्रारंभ होणार आहे. ‘गोवा मायनिंग पीपल्स फ्रंट’चे अध्यक्ष पुती गावकर यांनी खाण व्यवसायात येणार्‍या समस्यांविषयी मला काही सांगण्याची आवश्यकता नाही; कारण मी खाणपट्टीतूनच आलेलो आहे. गोव्यात खाणव्यवसाय ठप्प करण्यास काँग्रेस शासनातील माजी मुख्यमंत्री दिंगबर कामत हे उत्तरदायी आहेत, असा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी केला.

१०० ग्रामस्थांना भूमीची ‘सनद’ सुपुर्द !

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या वेळी मये येथील १०० ग्रामस्थांना भूमीची ‘सनद’ सुपुर्द केली. या वेळी ते म्हणाले, ‘‘मये येथील ‘स्थलांतरित मालमत्ते’चा प्रश्न शासन सोडवत आहे. मयेवासियांना ‘सनद’ देण्याविषयीचे अर्ज पूर्वी पणजी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात येत होते; मात्र आता ते डिचोली येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयात घेतले जाणार आहेत.’’