अमेरिकेने अफगाणिस्तानशी युद्ध करण्यासाठी ओसामा बिन लादेन याचा वापर केला ! – तालिबान

अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये जे केले, त्याचे समर्थन करता येणार नाही. त्यासह तालिबानही ज्या आतंकवादी कारवाया करत आहे, त्याचेही समर्थन करता येऊ शकत नाही. त्यामुळे स्वतःला सहानुभूती मिळवण्यासाठी तालिबान अशी वक्तव्ये करत आहे, हे जग जाणून आहे ! – संपादक  

काबुल – अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणाचा मुख्य सूत्रधार ओसामा बिन लादेन असल्याचे सांगण्यात येते; मात्र याविषयी कोणताही पुरावा नाही. अमेरिकेने अफगाणिस्तानशी युद्ध करण्यासाठी त्याचा वापर केला होता, असा दावा तालिबानचा प्रवक्ता जबीउल्लाह मुजाहिद याने एका मुलाखतीमध्ये केला. ‘आम्ही वारंवार आश्‍वासने दिली आहेत की, अफगाणिस्तानच्या भूमीवर आतंकवादाला सुरक्षित आश्रय मिळणार नाही’, असेही त्याने स्पष्ट केले. (एक आतंकवादी संघटना अशा प्रकारे आश्‍वासन देते, हे हास्यास्पद ! – संपादक)

महिलांनी घाबरू नये !

आम्ही महिलांचा आदर करतो. त्या आमच्या बहिणी आहेत. त्यांनी घाबरू नये. तालिबान्यांनी देशासाठी लढा दिला आहे. महिलांनी आमचा अभिमान बाळगला पाहिजे. त्यांनी घाबरू नये, असेही जबीउल्लाह याने सांगितले.

देशवासियांनी देश सोडून जावे, अशी आमची इच्छा नाही !

देशवासियांनी देश सोडून जावे, अशी आमची इच्छा नाही. त्यांनी यापूर्वी जे काही केले आहे (अमेरिकेला साहाय्य केले), त्यासाठी आम्ही त्यांना क्षमा केली आहे. आम्हाला तरुण आणि शिक्षित लोक यांची राष्ट्रासाठी आवश्यकता आहे; पण जर त्यांना देश सोडून जायचे असेल, तर तो त्यांचा प्रश्‍न आहे.