सावंतवाडी – तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण अभियानाच्या अंतर्गत देण्यात आलेले भ्रमणभाष संच बिघडल्याने ते अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेत्या कमलताई परुळेकर यांच्या उपस्थितीत एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी विनीत म्हात्रे यांच्याकडे परत करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाने राज्यातील अंगणवाडी सेविकांना पोषण आहार अभियानाच्या अंतर्गत दिलेले भ्रमणभाष संच बिघडले आहेत. त्यांची दिलेली हमी (वॉरंटी) संपली आहे. त्यामुळे पुन्हा नव्याने चांगल्या प्रतीचे भ्रमणभाष संच द्यावेत. त्यामध्ये मराठी भाषेत पोषण आहाराची माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली होती; मात्र या मागणीकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने हे भ्रमणभाष संच शासनाकडे जमा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने घेतला आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सबंधित अधिकार्यांकडे हे भ्रमणभाष संच परत केले जात आहेत.
या पार्श्वभूमीवर २३ ऑगस्टला सावंतवाडी तालुक्यातील मळेवाड, बांदा, निरवडे, सांगेली, आंबोली आदी ८ क्षेत्रांतील (बीटमधील) २६७ भ्रमणभाष संच एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी म्हात्रे यांच्याकडे जमा करण्यात आले.