सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी २४ ऑगस्ट ते ७ सप्टेंबरला रात्री १२ वाजेपर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या ३७ (१) (३) नुसार मनाई आदेश लागू केला आहे.
या कालावधीत शारीरिक इजा होईल, अशी कोणतीही वस्तू किंवा पदार्थ समवेत बाळगणे; कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी कृती करणे; आक्षेपार्ह घोषणा देणे, जिल्ह्यात ५ किंवा त्याहून अधिक लोकांनी एकत्र येणे, जमाव करणे, मिरवणुका काढणे, सभा घेणे यांस मनाई करण्यात आली आहे.
पोलीस अधीक्षकांनी निदर्शनास आणल्यानुसार सद्य:स्थितीत राज्यात वेगवेगळे राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राजकीय वैमनस्यातून आंदोलने करत आहेत. त्याचे पडसाद जिल्ह्यात उमटल्यास प्रसंगी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. विविध समाजाच्या आरक्षणावरून विविध संघटना, राजकीय पक्ष, कामगार संघटना त्यांच्या असलेल्या मागण्यांच्या संबंधाने न्याय मिळवून घेण्याकरता आक्रमक झालेल्या असून त्यांच्याकडूनही आंदोलने, निदर्शने होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढ आणि इतर कारणे यांवरून राजकीय पक्षाकडून टीकाटिपणी केली जात आहे. या कारणांवरून राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्याकडून आंदोलने, निदर्शने होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मनाई आदेश लागू करण्यात आला आहे.
उपरोक्त आदेश विवाहादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही.
मनाई आदेश असलेल्या कालावधीत मिरवणुकांना अनुमती देण्याचे अधिकार, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याची अनुमती देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक, तसेच त्यांनी प्राधिकृत केलेले इतर पोलीस अधिकारी यांस आणि पोलीस ठाणे प्रभारी यांना राहील, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.