१ सप्टेंबरपासून गोव्यातील प्रत्येक घराला १६ सहस्र लिटर पाणी विनामूल्य पुरवणार ! – दीपक पाऊसकर, सार्वजनिक बांधकाम मंत्री

सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर

पणजी, २३ ऑगस्ट (वार्ता.) – १ सप्टेंबरपासून गोव्यातील प्रत्येक घराला प्रतिमास १६ सहस्र लिटर पाणी विनामूल्य पुरवणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

मंत्री दीपक पाऊसकर पुढे म्हणाले, ‘‘गोव्यात पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. गोव्यात प्रतिदिन ६ सहस्र लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता भासते. गोव्यात आतापर्यंत प्रतिदिन ५ सहस्र ३०० लक्ष लिटर पाण्यावर प्रक्रिया करून ते पिण्यासाठी पुरवले जात आहे, तर प्रतिदिन ७०० लक्ष लिटर पिण्याच्या पाण्याची कमतरता आहे. पुढील ७-८ मासांत ही कमतरता भरून काढण्यात येणार आहे.

नवीन योजनेमुळे सप्टेंबरपासून राज्यातील पाण्याचे निम्मे ग्राहक पाण्यासाठी कोणतेही शुल्क भरणार नाहीत. गोव्यातील ३ लक्ष १४ सहस्र ग्राहकांपैकी १ लक्ष ५० सहस्र ग्राहक प्रतिमास ० ते १६ युनिट पाणी वापरतात. शासन नवीन योजनेनुसार प्रतिमास १६ युनिट (१६ सहस्र लिटर पाणी) पाणी विनामूल्य पुरवणार असल्याने हे १ लक्ष ५० सहस्र ग्राहक (४७.७७ टक्के) पाण्यासाठी कोणतेही शुल्क भरणार नाहीत. उर्वरित ग्राहक प्रतिमास १६ युनिटपेक्षाही अधिक पाण्याचा वापर करतात. या ग्राहकांना पहिले १६ युनिट विनामूल्य असेल आणि पुढील युनिटसाठी त्यांना नियमानुसार शुल्क आकारले जाणार आहे. ज्यांची पाण्याची देयके थकित आहेत, त्यांनी सध्या एकरकमी योजनेचा लाभ घेऊन थकित देयके भरावीत.’’

राष्ट्रीय महामार्ग डिसेंबरपर्यंत खड्डेमुक्त करणार

राष्ट्रीय महामार्गांची सर्व कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाणार आहेत आणि तोपर्यंत नागरिकांनी थोडी कळ सोसावी. राष्ट्रीय महामार्गांचे काँक्रीटीकरण करण्यापूर्वी रस्त्यावरील पूर्वीचे डांबर काढावे लागणार आहे. हे काम सध्या चालू झाले आहे. ‘अटल सेतू’ (मांडवी नदीवरील नवा पूल) ते गोवा वेल्हा या रस्त्यावर आता एकही खड्डा नाही. राज्यातील इतर रस्त्यांचे काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण केले जाणार आहे. २५ ऑगस्टपासून सार्वजनिक बांधकाम खाते रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम चालू करणार आहे.’’