‘फळाची अपेक्षा न करता कर्म करत राहिल्यास आध्यात्मिक प्रगती लवकर होते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले |
‘बहुतांश साधकांना ‘६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठणे, म्हणजेच प्रगती होणे’, असे वाटते. साधक पुढे येणार्या एखाद्या विशिष्ट दिवसापर्यंत (उदा. गुरुपौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी या दिवसांपर्यंत) किंवा स्वतःच्या वाढदिवसापर्यंत ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठण्याचे ध्येय ठरवतात आणि त्यापूर्वी काही कालावधी साधनेच्या प्रयत्नांना आरंभ करतात. ‘ठरवलेल्या समयमर्यादेत ध्येयपूर्ती व्हायलाच हवी’, अशी काही साधकांची अपेक्षा असते आणि ती न झाल्यास त्यांना दुःख होते. साधकांनी असे ध्येय अवश्य ठेवावे; पण ध्येयपूर्तीची अपेक्षा ठेवून त्या विचारांत अडकणे टाळावे.
६० टक्के किंवा त्यापुढील पातळी गाठणे, हे आध्यात्मिक उन्नतीचे दृश्य स्वरूप आहे; पण खरी प्रगती म्हणजे भगवंताने वेळोवेळी घडवलेल्या साधनेच्या प्रत्येक परीक्षेत उत्तीर्ण होणे ! प्रत्येक क्षणी आपल्या अंतर्मनाचे निरीक्षण करणे, मनातील अयोग्य विचार, निराशा आदी न्यून होण्यासाठी, तसेच अयोग्य कृती सुधारण्यासाठी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवणे, तसेच भाववृद्धीचे प्रयत्न करणे, ही प्रत्येक दिवशी केलेली प्रगतीच आहे.
६० टक्के आणि त्याहून अधिक आध्यात्मिक पातळी गाठणे आपल्या हातात नाही; मात्र प्रतिदिन निरपेक्षपणे आणि सातत्याने साधनेचे प्रयत्न करणे हे मात्र आपल्या हातात आहे. त्यामुळे तळमळीने प्रयत्न केल्यास गुरुकृपेने ६० टक्के आध्यात्मिक पातळी गाठता येईल, यात शंका नाही !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.७.२०२०)