आईशी बोलतांना तिला मायेत न अडकवता आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन देणारे सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि त्यांचे सांगणे त्वरित स्वीकारणार्‍या त्यांच्या आई श्रीमती प्रभावती शिंदेआजी !

सद्गुरु श्री. राजेंद्र शिंदे

१. धाकट्या मुलाच्या मित्राविषयी बोलतांना श्रीमती शिंदेआजींच्या डोळ्यांत पाणी येणे, त्यावर सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांना ‘आता कुणातही न अडकता केवळ देवातच अडकायचे आहे’, असे सांगितल्यावर शिंदेआजींनी संमतीदर्शक मान हालवणे

‘२०.४.२०२० या दिवशी सद्गुरु राजेंद्र शिंदे आणि त्यांची आई भोजनगृहातील एका पटलावर सकाळचा प्रसाद ग्रहण करत होते. त्या वेळी मी त्यांच्या समवेत बसले होते. शिंदेआजींना त्यांच्या धाकट्या मुलाच्या मित्राचा भ्रमणभाष आला होता. शिंदेआजी त्याविषयी बोलत होत्या. त्या वेळी आजी भावनाशील झाल्या आणि त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले. तेव्हा त्यांचे पुत्र सद्गुरु राजेंद्रदादा त्यांना म्हणाले, ‘‘भावनाशीलता नको. आपल्याला कुणातही अडकायचे नाही. आता केवळ देवातच अडकायचे आहे.’’आजींनीही त्यांचे म्हणणे स्वीकारून संमतीदर्शक मान हालवली. त्या शांत झाल्या. त्या वेळी सद्गुरु राजेंद्रदादा म्हणाले, ‘‘या वयात समजावून सांगणे पुष्कळ अवघड असते. इतक्या वर्षांचे संस्कार असल्याने नातेवाइकांच्या आठवणी काढल्या जातात, त्यांची काळजी वाटते. हे संस्कार सहजासहजी जात नाहीत.’’

श्रीमती प्रभावती शिंदे

२. सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी त्यांच्या आईला ‘शेष राहिलेला प्रसाद न टाकता वाटीत काढून ठेवून महाप्रसादाच्या वेळी खा’, असे सांगितल्यावर शिंदेआजींनी त्याप्रमाणे करणे

हे सर्व बोलणे होईपर्यंत आजींचा प्रसाद ग्रहण करून झाला होता. त्यांच्या ताटलीत थोडासा प्रसाद शेष होता. तेव्हा सद्गुरु राजेंद्रदादांनी त्यांना तो खाण्यास सांगितला. तेव्हा आजींनी ‘पुरे. आता नको’, असे सांगितले. त्यावर सद्गुरु राजेंद्रदादा म्हणाले, ‘‘तो प्रसाद आहे. टाकायचा नसतो. आवश्यक तेवढेच घेत जा. आता पोट भरले असेल, तर वाटीत काढून ठेव आणि महाप्रसादाच्या वेळी खा.’’ आजींनी त्यांचे म्हणणे स्वीकारले आणि प्रसाद वाटीत काढून ठेवला.

कु. नलिनी राऊत

३. अध्यात्म जगणारी माता आणि तिचा पुत्र

सद्गुरु राजेंद्रदादांनी आईला भावनिक स्तरावर न हाताळता आध्यात्मिक स्तरावर दृष्टीकोन दिले. त्यांच्या आईनेही ‘मुलगा मला आता काय शिकवत आहे ?’, अशा भूमिकेत न रहाता किंवा कोणतेही गार्‍हाणे करण्याऐवजी मुलाचे म्हणणे निमूटपणे स्वीकारले. ‘धन्य ती माता आणि धन्य तो पुत्र !’

‘हे गुरुमाऊली, ही सूत्रे शिकायला देऊन आपणच ती माझ्याकडून लिहून घेतलीत. त्याबद्दल मी आपल्या कोमल चरणी शरणागतभावाने कृतज्ञता व्यक्त करते.’

– कु. नलिनी राऊत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

(२०.४.२०२०)