पुणे रेल्वेस्थानकाला बाजीराव पेशवे यांचे नाव देण्याची पेशवे यांच्या वारसदारांची आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांची मागणी !

पुणे, २० ऑगस्ट – पुणे रेल्वेस्थानकाला श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे नाव देण्यात यावे, तसेच नव्याने होणार्‍या मेट्रोस्थानकाला श्रीमंत नानासाहेब पेशवे यांचे नाव द्यावे. शनिवारवाड्याची दुरवस्था झाल्याने राज्य आणि केंद्र सरकारने जीर्णोद्धारासाठी निधी द्यावा, तसेच शनिवारवाडा परिसरातील प्रलंबित कामे लवकर पूर्ण करावी, अशी मागणी पेशवे यांच्या वारसदार आणि माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनी १८ ऑगस्ट या दिवशी केली. पुणे महापालिका, थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि ब्राह्मण महासंघ यांच्या वतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या ३२१ व्या जयंतीनिमित्त महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते शनिवारवाडा येथील बाजीराव पेशवे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

इतिहास अभ्यासक मोहन शेटे म्हणाले, ‘‘थोरले बाजीराव पेशवे हे ४८ हून अधिक लढाया जिंकलेले जगातील एकमेव सेनापती होते. उत्तर हिंदुस्थानात दरारा निर्माण करणारे ते योद्धे होते. त्याकाळी मराठ्यांनी पानिपतमध्ये रक्त सांडले; म्हणून आजचा भारत आहे. शनिवारवाडा मराठ्यांच्या पराक्रमाची स्फूर्ती देत आहे.’’