वडगाव मावळ (जिल्हा पुणे) – ‘स्वच्छ भारत मिशन टप्पा २’ अंतर्गत फ्रेंड्स ग्रुप, तळेगाव दाभाडे, मावळ शिक्षक प्रबोधन परिवार आणि ‘हिरकणी शिक्षिका मैत्रीण ट्रेकिंग ग्रुप’ यांच्या वतीने लोहगड, तसेच गाव परिसराची संपूर्ण स्वच्छता करण्यात आली. मावळ पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या मार्गदर्शनातून राबवण्यात आलेल्या या उपक्रमात ७० शिक्षकांनी सहभाग घेतला. गडदुर्ग संवर्धन आणि स्वच्छता, तसेच युनेस्कोने नामांकन केलेल्या लोहगड स्वच्छता मोहीम राबवण्याची संकल्पना पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने मांडण्यात आली. त्याला शिक्षकांच्या तिन्ही ‘ग्रुप’नी प्रतिसाद दिला. स्वच्छता मोहिमेचे नेतृत्व गटविकास अधिकारी सुधीर भागवत, गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज, शिक्षण विस्ताराधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख निर्मला काळे आदींनी केले.
प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिकचे रॅपर्स, कागद इत्यादी कचरा त्यांनी गोळा केला. त्यानंतर लोहगडावर शिवव्याख्याते सचिन ढोबळे यांचे व्याख्यान झाले.