यजमानांच्या निधनानंतर साधनेच्या बळावर स्थिर रहाणार्‍या डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील श्रीमती अमृता अजय संभूस !

कै. श्री अजय संभूस

५.११.२०२० या दिवशी डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील कै. अजय संभूस यांचे वयाच्या ६३ व्या वर्षी निधन झाले. ते रुग्णाईत असतांना आणि त्यांच्या निधनानंतर त्यांची पत्नी श्रीमती अमृता संभूस यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

१. यजमान रुग्णाईत असतांना जाणवलेली सूत्रे

१ अ. यजमानांना रुग्णालयात भरती केल्यानंतर जुलाब झाल्याने अतीदक्षता विभागात ठेवण्यात येणे आणि त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत जाणे : ‘माझे यजमान रुग्णालयात भरती झाल्यानंतर ‘इतर लोकांप्रमाणे तेही १४ दिवसांत घरी येतील’, असे आम्हाला वाटत होते; परंतु रुग्णालयात भरती झाल्यानंतर २ – ३ दिवसांत त्यांना जुलाब झाल्याने अतीदक्षता विभागात ठेवण्यात आले. तेव्हा ते आम्हाला म्हणाले, ‘‘काळजी करू नका. मी लवकर बरा होईन’’; परंतु त्यानंतर त्यांची प्रकृती बिघडत गेली. त्यांच्या रक्तातील ‘ऑक्सिजन’ची पातळी अल्पाधिक होत होती. नंतर त्यांना कल्याण येथील खासगी रुग्णालयात भरती केले. त्यांना सतत ‘ऑक्सिजन बायपॅक’ (प्राणवायूचा पुरवठा करणारे यंत्र) लावावे लागत होते. त्यांना उच्च प्रतीची सर्व औषधे आणि ‘इंजेक्शन्स’ही चालू होती. त्यांना पुष्कळ अशक्तपणा आला होता.

श्रीमती अमृता संभूस

१ आ. साधिकेने यजमानांना साधना करण्यास आणि सकारात्मक रहाण्यास सांगणे : यजमानांना भ्रमणभाषवर अधिक बोलता येत नव्हते. जेव्हा त्यांच्याशी बोलणे व्हायचे, तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो, ‘‘अधिकाधिक नामजप करा. भावजागृतीचे प्रयत्न करा. गुरुदेवांचे चरण घट्ट धरून ठेवा.’’ सर्व औषधोपचार चालू होते; पण त्यांची प्रकृती सुधारत नव्हती. त्यांच्या मनात ‘आपण बरे होऊन घरी जाऊ कि नाही ?’, असे विचार येत होते. आम्ही त्यांना सकारात्मक रहाण्यास सांगत होतो. ते रुग्णाईत असतांना कधी चिडून किंवा रागावून बोलले नाहीत.

१ इ. ‘कोविड’मुळे आम्ही कुटुंबीय यजमानांना भेटायला जाऊ शकत नव्हतो; परंतु त्या कालावधीत ‘परात्पर गुरु डॉक्टर, सद्गुरु आणि संत सूक्ष्मातून त्यांच्या समवेत होते’, असे मला जाणवले.

२. यजमानांचे निधन

गुरुकृपेने यजमानांच्या निधनाच्या वेळी शांत आणि स्थिर राहू शकणे : देवाच्या मनात वेगळेच होते. ५.११.२०२० या दिवशी त्यांना देवाज्ञा झाली. खरेतर माझा स्वभाव पुष्कळ घाबरट आणि काळजी करणारा आहे; पण गुरुदेवांच्या कृपेमुळेच या प्रसंगात मी पुष्कळ शांत आणि स्थिर राहू शकले.

३. यजमानांच्या मृत्यूनंतर जाणवलेली सूत्रे

३ अ. गुरुकृपेमुळे यजमानांच्या मृत्यूनंतरचे सर्व विधी निर्विघ्नपणे पार पडणे : देवाच्या कृपेने यजमानांच्या मृत्यूनंतरचे सर्व विधी निर्विघ्नपणे पार पडले. घरातील वातावरण शांत होते. यजमान एक मास रुग्णालयात होते. त्यामुळे ‘१० व्या दिवशी पिंडाला कावळा शिवेल का ?’, असे मुलांना वाटत होते; पण पिंडाला कावळा शिवला. माझी गुरुमाऊली पुष्कळ महान आहे. माझे गुरुदेव सर्वकाही करू शकतात.

३ आ. त्या वेळी माझा मुलगा श्री. प्रथमेश आणि मुलगी सौ. प्रियांका (सौ. प्रियांका तपन भाटिया), हे दोघेही शांत अन् स्थिर होते.

३ इ. ‘यजमान आपल्यातून गेले’, असे मला अजूनही वाटत नाही. ‘ते सेवा आणि प्रसार यांसाठीच गेले आहेत’, असेच मला वाटते.

४. साधिका तिच्या यजमानांच्या निधनानंतर स्थिर असल्याचे पाहून तिच्या मैत्रिणी आणि नणंद यांनी काढलेले उद्गार !

अ. माझ्या दोन मैत्रिणी कीर्तनकार आहेत. त्या मला म्हणाल्या, ‘‘आम्हाला अध्यात्मातील सर्व तात्त्विक ठाऊक आहे; पण तू अध्यात्म आत्मसात केले आहेस.’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘ही सर्व माझ्या परात्पर गुरूंची शिकवण आणि कृपा आहे.’’

आ. माझी नणंद मला म्हणाली, ‘‘अध्यात्माविषयीचे ग्रंथ वाचायला बरे वाटते; पण तू केवळ साधना करत असल्यामुळेच इतकी शांत आणि स्थिर राहू शकलीस.’’

५. देवाने सुचवलेली सूत्रे

अ. ‘परात्पर गुरुदेव यजमानांची (स्थुलातून जितकी साधना झाली नसती, तितकी) सूक्ष्मातून साधना करवून घेणार आहेत’, असे मला वाटले.

आ. ‘या जन्मात ते माझे यजमान होते; पण देवाने त्यांना या आधी अनेक जन्म सांभाळले आहे’, असे मला जाणवले.

सर्व भगवंताची कृपा आहे. ‘देवानेच माझ्याकडून हे लिहून घेतले’, यासाठी देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’

– श्रीमती अमृता संभूस (पत्नी), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (१७.१.२०२१)