मृत्यूकडे कसे पहावे ?
१. यमराज हा मित्रच आहे !
जगात मनुष्याला सर्वांत मोठी भीती वाटत असेल, तर ती संकटांची आणि यमराजाच्या मृत्यूची; परंतु तो हा विचार करत नाही की, आपण पृथ्वीवर पूर्वकर्मांनुसार भोग भोगायला आलेलो आहोत. सर्वांना दंड देणारा सूर्यपुत्र यमराज आहे. तो कोणालाच सोडत नाही. संकटे मात्र शनिदेव पाठवतो. यमराजाचे आपल्यावर फार उपकार होतात. ‘शरिराला आलेल्या दुखण्यातून आम्हाला यमराजच सोडवतो; म्हणून यमराज आमचा शत्रू नाही, तर मित्रच आहे’, असे मला वाटते.’
२. मृत्यू म्हणजे सर्व दुःखापासून मुक्तता !
‘माणूस मरायला टेकला की, स्मरणशक्ती जाते. मेल्यावर दुखणे जाते, शरीर दुखत नाही. मृत्यू म्हणजे सर्व पिडांतून बाहेर येणे आणि सुख, समाधान, आनंद आणि शांती इथे पोचणे; पण माणसे म्हणतात, ‘आम्हाला मरायला फुरसत (वेळ) नाही.’’
३. मृत्यू म्हणजे मोठे सुख !
‘मृत्यू म्हणजे मोठे सुख असते. ‘आली दिवाळी आनंदाची । ही वाट द्वारकेची, पंढरीची ।।’ कोणाचा मृत्यू झाल्यास नातेवाईकांनी दुःखी कष्टी होऊ नये. कोण जन्माला आला आणि कोणाचा मृत्यू झाला ? आत्मा तर अमर आहे. हे वाचा आणि अर्थबोध घ्या. पृथ्वीतत्त्व पृथ्वीला, आपतत्त्व आपला, तेजतत्त्व तेजाला, वायुतत्त्व वायूला आणि आकाशतत्त्व आकाशाला मिळाले. असा शेवट झाला. आत्मा अमर राहिला, मग कोण मेला आणि कोण गेला ?’
४. परमेश्वराने बोलावल्यावर प्रत्येक जिवाने हसत-हसत ईश्वराकडे जावे !
‘पुत्र सुनील आणि सून दीपाली यांनी मी गेल्यावर कधीही रडू-ओरडू नये; कारण मी केवळ शरिराने जाणार आहे. शरीर थकले आहे; परंतु माझा आत्मा अमर आहे. अरे पोरांनो, मृत्यूमध्ये जेवढे सुख आहे, तेवढे सुख जिवंतपणे नसते. मी समाधीरूपाने तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी सदा उभाच आहे.
मृत्यूमध्ये फार मोठे सुख आहे; परंतु आत्महत्या हे पाप आहे. परमेश्वराने बोलावले की, प्रत्येक जिवाने हसत-हसत ईश्वराकडे जावे. जुने झालेले शरीर टाकावे आणि नवीन शरीर परिधान करावे. ‘जुना झालेला कपडा टाकावा. मग नवीन कपडा दुसरा मिळतोच’, असा उपदेश भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये केला आहे.’
(संदर्भ : लवकरच प्रकाशित होणार्या ग्रंथातून)
– पूज्य (ह.भ.प.) सखाराम रामजी बांद्रे (वय ७० वर्षे), कातळवाडी, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. (पू. सखाराम बांद्रे महाराज यांचे २००५ ते २०२० या कालावधीतील लिखाण आहे.)