१. रामनाथी आश्रमात आल्यावर ‘स्वतःभोवती त्रासदायक आवरण आहे’, असे जाणवणे, पू. गुंजेकरमामा यांची ध्वनीचित्र-चकती पाहिल्यावर आवरण दूर होऊन हलकेपणा जाणवून आनंद होणे आणि रात्री झोपतांना ‘वेगळ्याच लोकात आहे’, असे जाणवणे
‘मी रामनाथी आश्रमात आल्यावर पहिल्या दिवशी मला ‘माझ्याभोवती त्रासदायक शक्तीचे आवरण आहे’, असे जाणवत होते. मला ‘नुसते पहावे आणि लक्ष द्यावे’, एवढेच वाटत होते; पण सर्व आवरून झाल्यावर आश्रम पहातांना ‘स्वतःला सर्व ठाऊक आहे’, अशा भावाने मी आश्रम पाहिला. नंतर मी ध्यानमंदिरात बसून थोडा वेळ नामजप केला. पू. गुंजेकरमामा (सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर) यांची ध्वनीचित्र-चकती पाहिल्यावर माझ्याभोवती आलेले आवरण दूर होऊन मला हलकेपणा जाणवू लागला. माझ्या मनात कृतज्ञताभाव वाढून मला पुष्कळ आनंद झाला. रात्री झोपेपर्यंत ‘माझ्या आनंदात वाढ होऊन माझ्या शरणागतभावात वृद्धी होत आहे’, असे मला जाणवले. रात्री झोपतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांना मानस आत्मनिवेदन करतांना ‘मी वेगळ्याच लोकात आहे’, असे मला जाणवले. ‘आश्रमातील वातावरण पुष्कळ आल्हाददायक वाटून मी अगदी हलकी होऊन मऊ गादीवर झोपले आहे’, असे मला वाटत होते. त्या रात्री मला शांत झोप लागली.
२. ‘आश्रमातील चैतन्य ग्रहण करावे आणि आनंदात रमून जावे’, असे वाटणे
दुसर्या दिवसापासून माझ्यातील कृतज्ञताभाव आणि शरणागतभाव यांत वृद्धी झाली. ध्यानमंदिरात किंवा अन्य कुठेही मी नाम घेण्याचा प्रयत्न करूनही माझा नामजप होत नव्हता. माझ्या मनाला चैतन्य, आनंद आणि शांती यांची सतत जाणीव होत होती अन् ‘त्यात रमून जावे’, असे मला वाटत होते. माझ्या मनात कोणतेच विचार येत नव्हते आणि मला काही आठवतही नव्हते. मी भोजनकक्षात प्रसाद घ्यायला गेल्यावर प्रसाद म्हणून ताटात थोडेसे वाढून घेतलेले अन्न खाऊन झाल्यावर मला पोट भरल्याची जाणीव होत होती. ‘केवळ चैतन्य आणि आनंद घेत रहावे’, असेच मला वाटत होते. माझ्या मनाला स्थिरता जाणवत होती.
३. लागवडीच्या ठिकाणी गेल्यावर पंचमुखी नागदेवतेच्या स्थानाजवळच्या दगडावर बसून भावप्रयोग केल्यावर आलेल्या अनुभूती
लागवडीत जाण्याच्या वेळी वर चढतांना माझे पाय पुष्कळ दुखत होते. त्यामुळे ‘तेथे जाऊ नये. खाली निघून यावे’, असे मला वाटत होते. मला पाऊल उचलण्यासही कठीण होत होते; पण ‘पुन्हा इकडे यायला मिळणार नाही’, असे वाटून मी बळेच वर चढून गेले. तेथे पंचमुखी नागदेवतेच्या स्थानाजवळच्या दगडावर बसून मी भावप्रयोग केला. तेव्हा वारा मंद गतीने वहात होता. ‘त्या आल्हाददायक वार्यामुळे मी क्षणभर हलकी होऊन डोलत आहे’, असे मला जाणवत होते. त्याच वेळी मला तेथील झाडे आणि फुले-फळे यांचा एकत्रित वेगळाच सुगंध येऊ लागला. हा सुगंध घेतांना मला प्रसन्न वाटत होते. मी हा सुगंध मनसोक्त घेतला. ‘डोळे उघडू नये’, असे मला वाटत होते. ‘आकाश निरभ्र होऊन जवळ आले आहे. निसर्ग स्वतःहून इथे वास्तव्य करत आहे. किती सुंदर वातावरण आहे. इथेच बसून रहावे’, असे मला वाटले. माझ्या पायावर मंद वार्याची झुळुक आल्यावर माझ्या पायांतील जडत्व आणि सूक्ष्मातून त्रासदायक शक्तीचे गोळे निघून जाऊन मला हलकेपणा जाणवला; मात्र खाली उतरतांना माझे पाय दुखले नाहीत.’
– सौ. राजश्री कुलकर्णी, संभाजीनगर (१८.३.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |