गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील प्रसिद्ध श्री डासना देवी मंदिरात घुसून साधूंवर प्राणघातक आक्रमण  

  • उत्तरप्रदेशमध्ये गेल्या काही मासांमध्ये अनेक साधूंच्या हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. यावरून पोलिसांची निष्क्रीयता समोर येते, याकडे राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लक्ष देऊन साधूंचे रक्षण करण्यासाठी प्रयत्न करावा, असेच हिंदूंना वाटते !
  • हिंदूंच्या साधू-संतांच्या हत्या करून हिंदूंना नेतृत्वहीन करण्याचे हिंदुद्वेष्ट्यांचे षड्यंत्र आहे, हे जाणा !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील प्रसिद्ध श्री डासनादेवी मंदिरामध्ये बिहारमधील साधू, तसेच मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांचे सहकारी नरेश आनंद सरस्वती यांच्यावर अज्ञातांकडून प्राणघातक आक्रमण करण्यात आले. यात ते गंभीररित्या घायाळ झाल्याने त्यांना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले. या आक्रमणामागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. यापूर्वी महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्यावर आक्रमण करण्यासाठी २ धर्मांध संशयास्पदरित्या मंदिरात आले असल्याची घटना घडली होती. या मंदिराला आधीपासूनच पोलीस संरक्षण आहे. (असे आहे, तर साधूंवर आक्रमण होतांना पोलीस झोपा काढत आहेत का ? – संपादक)

१. अज्ञात मारेकरी मंदिराची संरक्षण भिंत ओलांडून मंदिराच्या परिसरात घुसला. त्याने चाकूने नरेश आनंद सरस्वती यांच्यावर आक्रमण केल्याचे म्हटले जात आहे. ही घटना पहाटे ३.४५च्या सुमारास घडली. नरेश आनंद सरस्वती एका कार्यक्रमासाठी बिहारच्या समस्तीपूरमधून मंदिरात आले होते. ते मंदिराच्या परिसरात उघड्यावरच झोपले असतांना आक्रमण करण्यात आले.

२. पोलिसांनी घटनेचे अन्वेषण चालू केले आहे. सीसीटीव्हीचे चित्रीकरण पडताळण्यात येत आहे.