आंतरशालेय ‘ऑनलाईन’ भगवद्गीता पठण स्पर्धेत अनुक्रमे प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले !
नवी मुंबई – नेरूळ येथील सनातनचे साधक दांपत्य सौ. स्मिता आणि श्री. प्रशांत तरकसबंद यांच्या मुली कु. मधुरा (वय ११ वर्षे) आणि कु. मयुरा (वय ११ वर्षे) यांनी आंतरशालेय ‘ऑनलाईन’ भगवद्गीता पठण स्पर्धेत इयत्ता ५ ते ७ वीच्या गटात पारितोषिक मिळवले आहे. कु. मधुरा हिने प्रथम, तर कु. मयुरा हिने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. पुणे विद्यार्थीगृह माजी विद्यार्थी मंडळाच्या मुंबई विभागाच्या वतीने प्रतिवर्षी या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. या वर्षी कोरोनामुळे विद्यार्थ्यांनी पठण केलेल्या श्लोकांचे व्हिडिओ मागवण्यात आले होते. जुलै २०२१ मध्ये ही स्पर्धा पार पडली. ‘या स्पर्धेत भगवान श्रीकृष्णाच्या आशीवार्दामुळे हे यश प्राप्त झाले’, असा दोघींचा भाव आहे.
या वर्षी श्रीमत् भगवद्गीतेतील अध्याय १६ मधील ‘दैवासूरसंपद् विभागयोग’ यातील २० संस्कृत श्लोकांचे पठण करण्याची स्पर्धा होती. नवी मुंबईतील विविध शाळांतील शेकडो विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले होते. कु. मधुरा आणि कु. मयुरा या दोघींनीही शिशूवर्गात असल्यापासून प्रतिवर्षी आंतरशालेय भगवद्गीता पठण स्पर्धेत सहभागी होऊन आतापर्यंत प्रथम, द्वितीय किंवा तृतीय पुरस्कार प्राप्त केले आहेत. चिन्मय मिशनद्वारे आयोजित भगवद्गीता पठण स्पर्धेतही त्या प्रतिवर्षी भाग घेऊन पुरस्कार प्राप्त करतात.
कु. मधुरा आणि कु. मयुरा दोघीही आई-वडिलांसह सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली साधना करतात. दोघीही नियमित नामजप करतात, तसेच आई-बाबांसमवेत सेवेत सहभागी होतात.
भगवद्गीता वक्तृत्व स्पर्धेत कु. मधुरा तरकसबंद हिचा तृतीय क्रमांक !
पुणे विद्यार्थीगृह माजी विद्यार्थी मंडळाच्या मुंबई विभागाच्या वतीने भगवद्गीता वक्तृत्व स्पर्धाही घेण्यात आली. यांतील इंग्रजी भाषेतून घेण्यात आलेल्या आंतरशालेय भगवद्गीता वक्तृत्व स्पर्धेत कु. मधुरा तरकसबंद हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला.