नागरिकांनी तीव्र विरोध करत राज्य सरकारला निर्णय पालटण्यास भाग पाडले !
परभणी – ‘कठोर शिस्तीच्या सनदी अधिकारी म्हणून ओळख असलेल्या सौ. आंचल गोयल येथील जिल्हाधिकारीपदी रूजू होऊ नयेत’, यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी मोठ्या प्रमाणात वरिष्ठ स्तरावर हालचाली केल्या होत्या; मात्र जनतेच्या मागणीमुळे सरकारला येथील जिल्हाधिकारी म्हणून गोयल यांची नियुक्ती कायम ठेवावी लागली आहे. गोयल यांनी ५ ऑगस्ट या दिवशी येथील जिल्हाधिकारीपदाचा पदभार स्वीकारला.
१. येथील तत्कालीन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर हे ३१ जुलै या दिवशी सेवानिवृत्त झाले. १३ जुलै या दिवशी येथील जिल्हाधिकारी म्हणून सौ. आंचल गोयल या सनदी अधिकार्यांची राज्य सरकारकडून नियुक्ती घोषित करण्यात आली होती. त्या पदभार घेण्यासाठी २७ जुलै या दिवशी येथे आल्या होत्या. त्यांनी जिल्ह्याचा आढावा घेण्याचे कामही चालू केले; मात्र या नियुक्तीमध्ये राजकीय हस्तक्षेप झाला.
२. गोयल यांना पदभार न देता राज्य सरकारकडून अपर जिल्हाधिकारी राजेश काटकर यांना पदभार देण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे तत्कालीन जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी निवृत्तीचा निरोप घेतांना काटकर यांच्याकडे स्वतःची सूत्रे सोपवली. यामुळे गोयल ३१ जुलै या दिवशी मुंबई येथे परतल्या.
३. या प्रकरणी संतप्त परभणीकरांनी आवाज उठवला. ‘सनदी महिला अधिकारी गोयल यांच्यासमवेत राजकीय डाव खेळून त्यांच्यावर अन्याय केला जात आहे’, अशी चर्चा चालू होऊन हा प्रकार माध्यमांसह परभणीकरांना मान्य झाला नाही. जागरूक नागरिक मंचच्या ध्वजाखाली एकत्र येऊन नागरिकांनी आंदोलन केले. त्यामुळे सरकारला स्वतःचा निर्णय कायम ठेवून गोयल यांना परभणीत रूजू करून घ्यावे लागले.