सोलापूर – मोहोळमध्ये विजय सरवदे आणि सतीश क्षीरसागर या शिवसैनिकांची अपघात भासवून हत्या करण्यात आली होती. या शिवसैनिकांच्या दुचाकी वाहनावर टेम्पो घालून अपघात असल्याचे भासवत ही हत्या करण्यात आली होती. कर्नाटक राज्यात लपून बसलेले ५ संशयित आरोपी संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, आकाश बरकडे आणि संदीप सरवदे यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. १५ जुलै २०२१ या दिवशी दुचाकीवरून जाणार्या या दोन शिवसैनिकांवर पाठीमागून टेम्पो घातल्याने सतीश नारायण क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झाला, तर गंभीर घायाळ झालेले विजय सरवदे यांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला.
१. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते संतोष सुरवसे, रोहित फडतरे, पिंटू सुरवसे, तसेच टेम्पो चालक भैय्या अस्वले या चौघांच्या विरोधात १५ जुलै या दिवशी गुन्हा नोंद करण्यात आला होता. त्यातील टेम्पो चालक भैय्या अस्वले याला १५ जुलै या दिवशी अटक करण्यात आली होती.
२. चार मासांपूर्वी सोलापूर शहरातील प्रभाग क्रमांक ८ आणि ९ मध्ये बोगस मतदार नोंदणी झाल्याच्या कारणावरून सिद्धार्थनगर येथील शिवसेनेचे कार्यकर्ते सतीश नारायण क्षीरसागर आणि विजय सरवदे या दोघांनी तक्रार प्रविष्ट केली होती. या तक्रारीवरून प्रांताधिकार्यांनी सुनावणी केली होती. त्यानंतर बोगस नावे न्यून करण्यात आली होती.
३. ‘रमाई आवास योजने’च्या संमत झालेल्या २८ धारिका गहाळ झाल्याविषयीही शिवसेनेच्या या २ कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते. (अपप्रकारांविषयी आवाज उठवणार्या राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्याचा आवाज संपवणारे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते जनतेची काय स्थिती करतील याची कल्पना करता येणार नाही. अशांवर कठोरात कठोर कारवाई होणे अपेक्षित ! – संपादक) या सर्व गोष्टींचा राग मनात धरून संशयित आरोपींनी हे कृत्य केल्याची माहिती आहे. सोलापूर ग्रामीणच्या मोहोळ पोलीस ठाण्याचे पोलीस या प्रकरणी अधिक अन्वेषण करत आहेत.