चोपडा येथील कै. अशोक हिरालाल पाटील (वय ५९ वर्षे) गेल्या १७ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करत होते. ‘हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून होणारी आंदोलने, गुरुपौर्णिमा, हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ यांसारख्या मोठ्या उपक्रमांत कै. पाटीलकाका समाजातील लोकांकडून तन, मन आणि धन अर्पण करून घेत असत. ५.४.२०२१ या दिवशी सकाळी ११ वाजता त्यांचे धुळे येथे निधन झाले. ३.८.२०२१ या दिवशी आपण कै. अशोक पाटील यांच्याविषयी त्यांच्या मुली सौ. जागृती पाटील आणि सौ. जयश्री चौधरी यांना जाणवलेली, तर ४.८.२०२१ या दिवशी साधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया. (भाग ४)
‘आतापर्यंतच्या लेखांमुळे कै. अशोक पाटील यांची गुणवैशिष्ट्ये सर्वांना लक्षात येतील. कै. अशोक पाटील यांच्या मुली सौ. जागृती पाटील आणि सौ. जयश्री चौधरी यांनी लिहिलेल्या लेखामुळे ‘आदर्श वडील कसे असतात’, हे कळले ! असा सुंदर लेख लिहिल्याविषयी सौ. जागृती पाटील आणि सौ. जयश्री चौधरी यांचे अभिनंदन !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
श्री. मगन भाऊसाहेब निंब, सचिव, कपिलेश्वर मंदिर ट्रस्ट, चोपडा, जिल्हा जळगाव.
‘परेश डेअरी’चे संचालक, वैदिक संस्कृतीचे कृतीशील प्रचारक, आप्त, मित्र, रंजल्या-गांजल्यांचे आधारवड असलेले कै. आबासो अशोक हिरालाल पाटील वर्डीकर ! तुम्ही असे अचानक आम्हास सोडून गेलात; पण आमचे मन मानतच नाही.
१. पुष्कळ कष्ट करून शून्यातून स्वतःचा व्यवसाय चालू करणे आणि प्रसिद्ध ‘डेअरी उद्योजक’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण करणे
तुम्ही तुमचे वडील कै. आण्णासो हिरालाल सखाराम पाटील यांचा विरोध झुगारून चोपडा शहर गाठले. खिशात एक रुपयाही नसतांना आपण पादत्राणे विक्रीच्या दुकानात काम केले आणि चहाही विकला. आपला हसतमुख स्वभाव आणि अंतःकरणातील प्रामाणिक वृत्ती यांमुळे अल्पावधीतच १०० लिटर दुधाच्या चहाची विक्री होऊ लागली. आपण चोपड्याच्या मध्यवर्ती भागात ‘परेश डेअरी’ नामांकित केली आणि चोपड्यात प्रसिद्ध ‘डेअरी उद्योजक’ म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.
२. कुटुंबासह सनातन संस्थेच्या माध्यमातून धर्मकार्यासाठी स्वतःला झोकून देणे
आपण मित्र आणि आप्तेष्ट यांना चोपड्यात स्थिर करून त्यांना वेगवेगळ्या व्यवसायांचा प्रारंभ करून दिला. माणसावर देव, ऋषि, पितृ आणि समाज यांचे ऋण असते. ते फेडले पाहिजे; म्हणून आपण पूर्ण कुटुंबासह सनातन संस्थेच्या माध्यमातून धर्मकार्यासाठी स्वतःला झोकून दिले.
३. आजच्या उच्च शिक्षित तरुणांसाठी आपले जीवन म्हणजे चालता-बोलता ग्रंथ होता.
४. निर्मात्याने आपल्याला ‘आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श पिता, आदर्श बंधू, आदर्श सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यकर्ता’, असे सर्वार्थांनी आदर्श बनवले होते.
असे अष्टपैलू व्यक्तीमत्त्व देवाने आमच्यातून हिरावून आम्हास पोरके केले. ही पोकळी कधीच भरून निघणार नाही. आपण आपल्या कार्यासाठी कायम चिरस्मरणात रहाल. ‘कै. आबांच्या आत्म्यास चिरशांती लाभो’, हीच प्रार्थना !’ (जुलै २०२१)
कु. भावना कदम (साधिका), नंदुरबार
१. कै. अशोक पाटीलकाकांनी पितृतुल्य प्रेम करणे
मी आणि काका हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने एकत्र सेवा करायचो. सेवा करतांना काका कधीही चिडायचे नाहीत. काका आणि काकू यांच्या समवेत सेवा करतांना मला ‘मी माझ्या आई-बाबांच्या समवेतच सेवा करत आहे’, असे वाटायचे.
२. ‘सर्व सेवा गुरुदेव करवून घेणार आहेत’, असा काकांचा भाव असायचा.
‘गुरुदेवांच्या कृपेने मला कै. अशोक पाटीलकाकांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्यांचा सहवास लाभला’, यासाठी मी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’ (१५.४.२०२१)
काका आमचे प्रेमसागर ।
काका आमचे प्रेमसागर ।
जणू आनंदाचा
झरा निरंतर ।। १ ।।
गुरुकार्यास सदा तत्पर ।
सेवा करिती परिपूर्ण ।। २ ।।
कधी न दिसे ताणतणाव ।
नम्रपणाची जणू
ती खाण ।। ३ ।।
गुरुरूप पहाती
प्रत्येक साधकात ।
असे असती आमचे काका ।। ४ ।।
सोडून माया झाला प्रवास चालू ।
हा जीव आला गुरुचरणी ।। ५ ।।
– कु. भावना कदम, नंदुरबार (१५.४.२०२१)