‘लोकसंख्येचा विस्फोट’ हे देशातील अनेक समस्यांचे मूळ कारण ! – अधिवक्ता अश्विनी उपाध्याय, सर्वाेच्च न्यायालय, नवी देहली

अधिवक्ता अश्विनी उपाध्याय

‘अंथरूण पाहून पाय पसरावेत’, असे म्हटले जाते; पण लोकसंख्येच्या संदर्भात भारताने आधीच १० पट पाय पसरले आहेत. जगाच्या तुलनेत भारताची भूमी २ टक्के आहे, तर पिण्याचे पाणी ४ टक्के आहे; पण लोकसंख्या मात्र २० टक्के आहे. भारतातील पाणी, जंगल, भूमी यांच्या समस्या; अन्न, वस्त्र, निवारा यांच्या समस्या; गरिबी, भूकबळी, बेरोजगारी आदी बहुतांश समस्या, तसेच प्रामुख्याने गुन्हेगारीची समस्या या सर्वांचे मूळ लोकसंख्येचा विस्फोट हे आहे. त्यामुळे कोणत्याही सरकारने कितीही पायाभूत सोयीसुविधा निर्माण केल्या, तरी काही वर्षांनी त्या अल्प पडणार आहेत. यावर कठोर असा ‘लोकसंख्या नियंत्रण कायदा’ केल्यास देशातील ५० टक्के समस्या त्वरित संपतील.