|
चंद्रपूर – येथील महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पदाधिकार्यांनी प्रत्येक कामात टक्केवारी, भागीदारी आणि काम मिळवण्यासाठी दादागिरी यांचा नवीन पायंडा पाडला आहे. त्यांना भ्रष्ट अधिकार्यांची साथ आहे. त्यामुळे भरमसाठ मालमत्ता कर देणार्या चंद्रपूरकरांच्या पैशांचा, तसेच सरकारच्या निधीचा दुरूपयोग होत आहे. पदाधिकारी आणि अधिकारी यांच्या गैरवर्तणुकीमुळे राज्यात चंद्रपूरची अपर्कीती होत आहे. त्यामुळे महानगरपालिका विसर्जित करून त्यावर प्रशासकाची नियुक्ती करावी, अशी मागणी शहरविकास आघाडीचे नगरसेवक पप्पू देशमुख, दीपक जयस्वाल आणि वंदना आखरे यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली.
नगरसेवक पप्पू देशमुख पुढे म्हणाले की, महापालिकेत महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवि आस्वानी आणि आयुक्त राजेश मोहिते या चौकडींची सत्ता असून त्यांचा अनागोंदी कारभार चालू आहे. ‘ऑनलाईन’ सभेत नियमांचे उल्लंघन केल्यामुळे विरोधी पक्षातील काही नगरसेवक आणि सत्ताधारी पक्षाचे समर्थक असलेल्या एका नगरसेवकावर कारवाई करण्यात आली. या सभेत पिठासीन अधिकारी महापौर राखी कंचर्लावार यांनी विरोधकांवर नामफलक आणि पाण्याची बाटली फेकली. महापौरांनी लोकशाहीत हा नवीन पायंडा पाडला आहे. महापौरांचे पती आणि नगरसेवक संजय कंचर्लावार यांनी उपायुक्तांना शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. महानगरपालिका अधिनियमातील कलम १२ नुसार या सदस्यांची वर्तणूक गंभीर असतांनाही आयुक्त राजेश मोहिते यांनी त्यांच्याविरुद्ध कारवाई केलेली नाही. सभागृहात अनधिकृत कृत्य करणारे पिठासीन अधिकारी आणि इतर पदाधिकारी यांचा बचाव ते करत आहेत, असा आरोप त्यांनी केला.
नगरसेवक कंचर्लावार यांना अटक करण्याची मागणी
‘महानगरपालिकेचे उपायुक्त विशाल वाघ यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नगरसेवक संजय कंचर्लावार यांना तात्काळ अटक करावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. (अशी मागणी का करावी लागते. – संपादक)