मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातनची युवा साधिका कु. मंजुषा पै हिला इयत्ता १२ वीच्या परीक्षेत सर्व विषयांत १०० टक्के गुण प्राप्त !

कु. मंजुषा पै

मंगळुरू (कर्नाटक) – येथील सनातन संस्थेची युवा साधिका कु. मंजुषा पै हिला इयत्ता १२ वीच्या वाणिज्य शाखेच्या परीक्षेत सर्व विषयांत १०० टक्के गुण मिळाले.

कु. मंजुषा ही येथील साधिका सौ. लक्ष्मी पै यांची कन्या आहे. कु. मंजुषा ही दक्षिण कन्नड जिल्ह्यात कन्नड भाषेतील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या विज्ञापनांची संरचना करणे, ‘ऑनलाईन’ सत्संगातील प्रक्रियेची सेवा करणे, तसेच प्रासंगिक ‘ऑनलाईन’ कार्यक्रमांचे चित्रीकरण करणे, या सेवा करते. या यशाविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना कु. मंजुषा हिने ‘शिक्षणासह गुरुसेवाही नियमितपणे केल्याने मला परीक्षेत यश मिळाले’, असे सांगून श्रीगुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.

परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करणारी कु. मंजुषा पै !

कु. मंजुषा हिच्यातील गुणवैशिष्ट्ये सांगतांना सौ. लक्ष्मी पै म्हणाल्या, ‘‘कु. मंजुषा हिच्यात स्वीकारण्याची वृत्ती असणे आणि परिपूर्ण सेवा करण्याचा प्रयत्न करणे, हे विशेष गुण आहेत. तिने परीक्षेच्या काळातही परिश्रम घेऊन गुरुसेवा केली.’’