सांगली, १ ऑगस्ट (वार्ता.) – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेले धारकरी कोणत्याही आपत्तीत नेहमी नागरिकांसाठी धावून जातात. नुकत्याच राज्यात अनेक ठिकाणी येऊन गेलेल्या पुरात आणि पुरानंतर अनेक जिल्ह्यांत, तसेच कर्नाटक राज्यातही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी प्रतिदिन पूरग्रस्तांना साहाय्य करत आहेत.
१. बेळगाव येथे छत्रे वाडा, अनसुरकर गल्ली येथे संघटनेचे पूरग्रस्त साहाय्यता केंद्र उभे करण्यात आले आहे. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पूजन श्री. मोहन बेळगुंदकर आणि छत्रेगुरुजी यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी जिल्हाप्रमुख श्री. किरण गावडे म्हणाले, बेळगाव मधील धारकरी, वारकरी, व्यापारी, दानशूर व्यक्ती यांनी जमेल त्या स्वरूपात जीवनावश्यक वस्तू (धान्य, कपडे, चादरी, तसेच अन्य) साहाय्यता केंद्रामध्ये जमा करावे. आपण दिलेले साहाय्य योग्य ठिकाणी पोचेल. याच समवेत प्रतिष्ठानच्या वतीने डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या साथीच्या रोगांवर लवकरच रोगप्रतिकारक औषध देण्यात येणार आहे.
या वेळी सर्वश्री परशराम कोकीतकर, विश्वनाथ पाटील, अजित जाधव, कल्लाप्पा पाटील, पुंडलिक चव्हाण, अनंत चौगुले, अंकुश केसरकर, किरण बडवाणाचे, चंदू चौगुले, प्रवीण मुरारी, नितीन कुलकर्णी यांसह अन्य उपस्थित होते.
२. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या पिंपरी-चिंचवड येथील धारकर्यांनी बीरवाडी, महाड येथील कुंभारआळी येथे पूरग्रस्तांना घरगुती साहित्य आणि ब्लँकेट देण्यात आले.
३. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या नाशिक येथील धारकर्यांनी कोकणातील पूरग्रस्तांना साहाय्य केले.
४. सांगलीतील धारकर्यांकडून पूरग्रस्तांना लागेल ते साहाय्य करणे, त्यांची घरे स्वच्छ करण्यासाठी साहाय्य करणे, तसेच विविध भागांमधील देऊळ स्वच्छता अभियान चालू आहे. धारकर्यांकडून मारुति चौक येथे असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती स्वच्छ करण्यात आली. धारकरी अंकुश जाधव यांनी संकष्ट चतुर्थीला मगरमच्छ कॉलनी येथील पूरग्रस्तांना खिचडी वाटप केली.