गोव्यात ऑक्सिजनअभावी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही !

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा विधानसभेत दिली माहिती

ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

पणजी, ३० जुलै (वार्ता.) – गोवा वैद्यकीय महाविद्यालयात ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता. राज्यातील एकाही शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनअभावी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, असा दावा आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी गोवा विधानसभेत केला. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे उत्तर देत होते.

ते पुढे म्हणाले, ‘‘मे २०२१च्या दुसर्‍या आठवड्यात कोरोनाबाधित रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आणि यामुळे ऑक्सिजनची मागणी अचानकपणे वाढली. यामुळे अतिरिक्त ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात आला. राज्यातील एकाही शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा नव्हता आणि यामुळे कोणत्याही शासकीय रुग्णालयात ऑक्सिजनअभावी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.’’

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्या विधानामुळे लोकांच्या मनात संभ्रम !

राज्यात कोरोनाचा कहर चालू असतांना ११ मे २०२१ या दिवशी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे म्हणाले होते, ‘‘गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (‘गोमेकॉ’त) पहाटे २ वाजता कोरोनाबाधित २६ रुग्णांचा मृत्यू झाला. यामागील नेमके कारण शोधण्यासाठी उच्च न्यायालयाकडून अन्वेषण झाले पाहिजे. ‘गोमेकॉ’तील ऑक्सिजनच्या पुरवठ्याविषयी उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून श्वेतपत्रिका सिद्ध करावी. आजपर्यंत ऑक्सिजनाचा सुरळीत पुरवठा होण्यासाठी १ सहस्र २०० जंबो सिलिंडरची आवश्यकता होती; मात्र यामधील केवळ ४०० सिलिंडर पुरवले गेले आहेत. वैद्यकीय ऑक्सिजनच्या पुरवठ्यात काही कमतरता असेल, तर ती भरून काढण्याविषयी चर्चा झाली पाहिजे.’’ त्यांचे हे विधान राष्ट्रीय वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले होते.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी ११ मे २०२१ या दिवशीचे वरील विधान आणि ३० जुलै या दिवशी गोवा विधानसभेत गोव्यात ऑक्सिजनच्या अभावी एकही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचा केलेला दावा यांमुळे लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे.