World’s Largest SriRam Temple : ऑस्ट्रेलियात बांधले जाणार जगातील सर्वांत भव्य श्रीराममंदिर

पर्थ (ऑस्ट्रेलिया) – ऑस्ट्रेलियातील पर्थ येथे भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर बांधले जाणार आहे. हे जगातील सर्वात भव्य श्रीराम मंदिर असेल. या मंदिराचे भूमीपूजन २०२५ मध्ये केले जाईल. त्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित रहाण्याची शक्यता आहे. या मंदिराची रचना भारतीय वास्तूविशारद आशिष सोमपुरा यांनी सिद्ध केली आहे. आशिष सोमपुरा यांनीच अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवर बांधलेल्या भगवान श्रीरामाच्या मंदिराची रचना केली होती.

याविषयी मिळालेल्या माहितीनुसार, पर्थ शहरातील १५० एकर भूमीवर हे मंदिर बांधण्यात येणार आहे. या मंदिराला ५ मजले असून त्याची एकूण उंची ७२१ फूट असेल. या मंदिराच्या परिसरात श्री हनुमंताची १५१ फूट उंच मूर्ती उभारण्यात येणार आहे. यामध्ये एक सप्तसागर असेल आणि त्यात महादेवाची ५१ फूट उंच मूर्ती असेल. यासह मंदिराच्या परिसरात अयोध्यापुरी आणि सनातन विद्यापीठ उभारले जाणार आहे. हे मंदिर ‘श्रीराम टेंपल फाऊंडेशन’च्या वतीने बांधले जाणार आहे. हे मंदिर जगातील सर्वात उंच असेल, असे ‘श्रीराम टेंपल फाऊंडेशन’चे सचिव अमोद प्रकाश कटियार यांनी सांगितले.