मुंबई – हिंदूंना एकत्र येण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक है, तो सेफ है’ (‘एकत्रित रहाल, तर सुरक्षित रहाल’) या घोषणेची काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी खिल्ली उडवली आहे. ‘नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी हे एकत्र आहेत अन् सुरक्षित आहेत. जनता मात्र असुरक्षित आहे’, असा अर्थ राहुल गांधी यांनी सांगितला.
१८ नोव्हेंबर या दिवशी मुंबईमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी एक तिजोरी मागवली. त्या तिजोरीवर ‘एक है, तो सेफ है’, असे लिहिलेले होते. ती तिजोरी उघडून राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योजक गौतम अदानी यांचे चित्र असलेले पोस्टर दाखवले. या वेळी राहुल गांधी म्हणाले, ‘‘मोदी आणि अदानी यांचे लक्ष धारावीकडे आहे. एकीकडे अदानी आहेत, तर दुसरीकडे शेतकरी, शेतमजूर, तरुण यांची स्वप्ने नियमित तोडली जात आहेत. ‘एक है, तो सेफ है’, या घोषणेतील सेफ (सुरक्षित) नरेंद्र मोदी, गौतम अदानी आणि अमित शहा हे आहेत. कष्ट मात्र धारावी येथील जनतेला होत आहेत. एका व्यक्तीसाठी धारावी संपवली जात आहे.’’ धारावी परिसरात विकासासाठी प्रकल्प राबवण्यात येणार आहे. भाजपच्या महायुती सरकारच्या काळात या प्रकल्पाचे काम अदानी यांना मिळाले होते. त्यानंतर विरोधकांनी सरकारवर टीका चालू केली होती.
संपादकीय भूमिकाकाँग्रेसला दुसर्यांची अपकीर्ती आणि त्यांना विरोध करणे याशिवाय दुसरे येतेच काय ? |