२१ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत काढणार हिंदु एकता यात्रा !
छत्तरपूर (मध्यप्रदेश) – आम्ही भारताची स्थिती बांगलादेशासारखी होऊ देणार नाही. आम्ही हिंदूंना जागृत करू, असे विधान येथील बागेश्वर धामचे पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री येत्या २१ ते २९ नोव्हेंबर या कालावधीत बागेश्वर धाम ते ओरछा या १६५ किलोमीटर क्षेत्रामध्ये हिंदु एकता पदयात्रा काढून हिंदूंना जागृत करणार आहेत. त्याविषयी ते बोलत होते.
हिंदूंना कट्टर बनवण्यासाठी एकता यात्रा !
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री पुढे म्हणाले की, वेगवेगळ्या पंथांमध्ये विभागलेल्या सनातन हिंदूंना कट्टर हिंदू बनवण्यासाठी ही एकता यात्रा काढली जात आहे. आम्ही एक ध्येय आणि दूरदृष्टी घेऊन पुढे जात आहोत. सर्व जातीभेदांचा अंत, हा आमच्या प्रवासाचा मुख्य उद्देश आहे. राष्ट्रध्वज आणि धार्मिक ध्वज या दोहोंना समान आदर आहे. सर्व धर्मांचे लोक या सनातन यात्रेत सहभागी होऊ शकतात. यासाठी आम्ही कुणालाही दोष देणार नाही. जर आपण चांगले काम करत आहोत, तर त्यांनीही त्यात सहभागी व्हावे; कारण देश त्यांचादेखील आहे. या देशात रहाणार्या इस्लामी आणि ख्रिस्ती समाजातील लोक आधी हिंदू होते, नंतर त्यांनी धर्मांतर केले. या यात्रेसाठी कोणत्याही धर्माच्या लोकांना आमंत्रित केले जाणार नाही.
वक्फ बोर्ड विसर्जित करा किंवा सनातन बोर्ड स्थापन करा !
पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री म्हणाले की, वक्फ बोर्डाकडे काही वर्षांपूर्वी काही सहस्र एकर भूमी होती, आज ती ९ लाख एकर झाली आहे. तरीही हिंदू गप्प बसले आहेत. हिंदू भ्याड बसले आहेत. हिंदू झोपले आहेत. ५०० वर्षे श्रीरामाच्या मंदिरासाठी लढणारा झोपलेला हिंदू कोण आहे ? एकतर वक्फ बोर्ड विसर्जित करा किंवा सनातन बोर्ड स्थापन करा.