६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे (कै.) अरविंद गाडगीळ यांना त्रास होत असतांना त्यांची पत्नी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी करवून घेतलेले आध्यात्मिक स्तरावरील विविध प्रयत्न !

आषाढ कृष्ण पक्ष अष्टमी (३१.७.२०२१) या दिवशी असलेल्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने…

सनातन संकुल, देवद, पनवेल येथील ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचे साधक अरविंद गाडगीळ यांचे आषाढ कृष्ण पक्ष अष्टमी या दिवशी वर्षश्राद्ध आहे. त्या निमित्ताने त्यांची पत्नी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा गाडगीळ यांनी यजमानांच्या आजारपणात आध्यात्मिक स्तरावर केलेले प्रयत्न प्रसिद्ध करत आहोत. (हे लिखाण कै. अरविंद गाडगीळ यांच्या निधनापूर्वीचे असल्यामुळे लिखाणातील काळ पालटला नाही.)

कै. अरविंद गाडगीळ

१. यजमानांना आध्यात्मिक त्रास होत असतांना त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी सांगून प्रोत्साहन देणे आणि त्यांच्याकडून नामजप अन् प्रार्थना म्हणवून घेऊन त्यांना आध्यात्मिक स्तरावर ठेवण्याचा प्रयत्न करणे

‘माझे यजमान श्री. अरविंद गाडगीळ यांना आध्यात्मिक त्रास होत असतांना  त्यांना ‘परम पूज्य डॉक्टर’, हा शब्द उच्चारणे पुष्कळ कठीण जाते. तेव्हा मी त्यांना ‘आपल्याला लढायचे आहे. परात्पर गुरु डॉक्टर तुमच्या समवेत आहेतच. तुम्ही वाईट शक्तींना घाबरू नका. आपल्याला हरायचे नाही. जिंकायचे आहे ना ? तुमचा नामजप करत असलेला लिंगदेह वाईट शक्तींसमवेत जाऊ द्यायचा नाही. परम पूज्य तुमच्या शेजारीच आहेत. दिसले ना ?’, असेही विचारते. त्या वेळी त्यांना ‘आपल्याला लढायचे आहे’, याची जाणीव होते. मी त्यांना सांगते, ‘‘परम पूज्य’ असे म्हणा.’’ मग यजमान तसे म्हणतात. ते मधूनच ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’ असा जयघोष करतात. नंतर त्यांना प्रेरणा मिळते. त्यानंतर थोड्या वेळाने मी त्यांच्याकडून ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ।’ हा नामजप म्हणून घेते. लहान मुलाला ज्याप्रमाणे सांगतात, त्याप्रमाणे मी यजमानांना एकेक शब्द सांगते आणि नंतर यजमान माझ्यामागून जप अन् प्रार्थना म्हणतात.

श्रीमती मनीषा गाडगीळ

२. यजमानांकडून म्हणून घेत असलेल्या प्रार्थना

अ. परम पूज्य, तुम्ही मला वाईट शक्तींशी लढायला शिकवा.

आ. परम पूज्य, तुमची सर्व साधकांवर अखंड कृपा असू दे.

इ. परम पूज्य, तुम्ही माझ्याकडून साधनेसाठी सतत प्रयत्न करवून घ्या.

ई. परम पूज्य, मला तुमचा एक क्षणही विसर पडू देऊ नका.

त्यांनी प्रार्थना म्हटल्यावर मी त्यांना सांगते, ‘‘युद्ध जिंकलात. शाब्बास !’’ नंतर आमचा ‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे ।’, हा श्लोक म्हणून झाल्यावर मी त्यांना झोपायला सांगते.

३. यजमानांना वाईट शक्तींचा त्रास होत असूनही ते करत असलेले प्रयत्न पाहून परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटणे

यजमानांना ज्या वेळी आध्यात्मिक त्रास होत नसेल, त्या वेळी मी त्यांना ‘वरील सर्व प्रयत्न का करत आहोत ?’, याविषयी समजावून सांगते. तेव्हा मी सांगितलेले यजमानांना पटल्याने ते होकार देतात आणि माझ्याकडून काही सांगायचे राहिले असल्यास ते मला खुणेने आठवण करून देतात.

४. परात्पर डॉ. आठवले प्रत्येक साधकाला घडवत असल्याविषयी त्यांच्याप्रती कृतज्ञता वाटणे

यजमानांना वाईट शक्तींचा त्रास होत असूनही ते करत असलेले प्रयत्न पाहून मला परात्पर गुरु डॉक्टरांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटते. ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक साधकाला कसे घडवत आहेत !’, हे अनुभवता आल्याने माझे मन कृतज्ञतेने भरून येते. परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्रीमती मनीषा गाडगीळ, सनातन संकुल, देवद, पनवेल. (१९.५.२०२०)

शेवटची कोणतीही इच्छा न रहाणे, तसेच आजारपणातही सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजप करवून घेतल्याने आनंदी रहाता येत असल्याचे यजमानांनी सांगणे

‘१२.५.२०२० या दिवशी माझे यजमानांशी (श्री. अरविंद गाडगीळ यांच्याशी) पुढील संभाषण झाले,

मी : तुमची काही इच्छा राहिली असेल, तर सांगा. मनात काहीही ठेवू नका.

यजमान : मनात काहीही नाही. (मान हलवून मनात काही नसल्याचे सांगितले.)

मी : गेली ४ वर्षे तुमच्याकडून शारीरिक सेवा झाली नाही. सूक्ष्मातील परात्पर गुरु डॉक्टरांनी तुमच्याकडून नामजप करवून घेतला. त्यामुळे तुम्हाला आनंदी रहाता येते. (यजमानांनी कृतज्ञतेने हात जोडले.) तुमच्या मृत्यूनंतर तुम्ही दुसर्‍या लोकात गेल्यावर जोमाने सेवा करणार ना ?

यजमान : हो.’

– श्रीमती मनीषा गाडगीळ (१९.५.२०२०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.