|
|
नवी देहली – पेगॅसस हेरगिरी प्रकरणावरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे ७ दिवसांत लोकसभेचे ३८ घंटे, तर राज्यसभेचे ३३ घंटे ८ मिनिटे वाया गेली आहेत. संसदेच्या पावसाळी अधिवेशनास १९ जुलैपासून आरंभ झाला. एकूण ९ दिवस संसदेचे कामकाज झाले. यांपैकी मागील ७ दिवसांत लोकसभेचे केवळ ४ घंटे, तर राज्यसभेचे केवळ ८ घंटे २ मिनिटे कामकाज होऊ शकले. परिणामी संसदेच्या दोन्ही सभागृहांचा मिळून एकूण ५३ कोटी ८५ लाख रुपयांचा चुराडा झाला. संसदेच्या एका घंट्याच्या कामकाजाचा व्यय (खर्च) तब्बल अडीच लाख रुपये इतका आहे. अधिवेशनाचा दुसरा आठवडा समाप्त झाला आहे.
अधिवेशनात आतापर्यंत या सूत्रांवरून झाला गदारोळ !
१. भाजपचे खासदार निशिकांत दुबे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा यांच्यातील वाद
२. देशभरात ‘ऑक्सीजन’च्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू नाही’, अशी केंद्र सरकारने दिलेली माहिती
३. केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबमधील शिरोमणि अकाली दलाच्या खासदारांचे संसदेच्या परिसरात चालू असलेले निषेध आंदोलन, तसेच २२ जुलैपासून जंतरमंतर येथे चालू असलेले शेतकरी आंदोलन
४. पेगॅसस हेरगिरी प्रकरण
५. तृणमूल काँग्रेसचे खासदार शांतनु सेन यांचे निलंबन
यापुढे कागद फेकण्यासारखी अपकृत्ये करणार्या खासदारांवर कारवाई होऊ शकते ! – लोकसभा अध्यक्ष
यापुढे कागद फेकाफेकी करण्यासारखी अपकृत्ये करणार्या खासदारांवर कारवाई केली जाऊ शकते, अशी चेतावणी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिरला यांनी सर्व खासदारांना दिली. २८ जुलै या दिवशी विरोधी पक्षांच्या खासदारांनी सभागृहात कागदांची फेकाफेकी केली. त्यांनी लोकसभा अध्यक्षांच्या दिशेनेही कागद भिरकावले. त्यावरून अध्यक्षांनी त्यांना वरील चेतावणी दिली. ते पुढे म्हणाले की, या सभागृहात कागद फेकाफेकीचा प्रकार अत्यंत दुःखद आणि या प्रतिष्ठित सभागृहाच्या मानदंडांच्या अन् नैतिकतेच्या विरुद्ध होता. जर कुठल्याही खासदाराला समस्या असेल, तर त्याने माझ्या कार्यालयात येऊन ती मांडावी.