रात्रभर अल्पवयीन मुली समुद्रकिनार्‍यावर काय करतात ? पालकांनी अधिक दायित्वाने वागावे ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

रामराज्यात स्त्रिया रात्रीच्या वेळीही सुवर्णालंकार घालून फिरायच्या; कारण ‘मध्यरात्रीही रस्त्यावरून एकटी फिरत असले, तरी मी सुरक्षित आहे’, याची तिला खात्री होती. याचे कारण रामराज्यातील जनता सात्त्विक होती !

बाणावली समुद्रकिनार्‍यावर पोलीस असल्याचा बहाणा करून बलात्कार

पणजी, २९ जुलै (वार्ता.) – अल्पवयीन मुली पूर्ण रात्रभर समुद्रकिनार्‍यावर काय करतात ? पालकांनी याचा अंतर्मुख होऊन विचार करणे आवश्यक आहे. केवळ मुले ऐकत नाहीत; म्हणून आपण मुलांचे दायित्व शासन आणि पोलीस यांच्यावर ढकलू शकत नाही, असे विधान गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. बाणावली समुद्रकिनार्‍यावर उत्तररात्री ३ वाजता २ अल्पवयीन मुलींवर ४ संशयितांनी पोलीस असल्याचा बहाणा करून बलात्कार केला. या घटनेनंतर पोलिसांनी ४ संशयितांना कह्यात घेतले आहे. या प्रकरणी अन्वेषणासाठी राजकीय दबाव येत असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून होत आहे. हे प्रकरण आता अन्वेषणासाठी कोलवा पोलिसांकडून पणजी महिला पोलिसांकडे देण्यात आले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘बाणावली बलात्कार प्रकरणातील संशयित शासकीय कर्मचार्‍याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.’’

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या विधानावर काँग्रेसचे प्रवक्ते अल्टो डी कोस्ता म्हणाले, ‘‘राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडली आहे. रात्री फिरण्यासाठी लोकांना भीती का वाटली पाहिजे ?’’ (जनतेला काँग्रेसने स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांत साधना न शिकवल्यानेच जनतेमध्ये बलात्कारी, खुनी, चोर, भ्रष्टाचारी यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडलेली आहे यात नवल काही नाही ! – संपादक) ‘गोवा फॉरवर्ड’चे आमदार विजय सरदेसाई यांनी बलात्कार प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेले विधान लज्जास्पद असल्याचा आरोप केला आहे. ‘आप’ने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या विधानाचा निषेध केला आहे.

बाणावली येथील बलात्कार प्रकरणाचे अन्वेषण गुणवत्तेच्या आधारावर ! – मुकेश कुमार मीना, पोलीस महासंचालक

मुकेश कुमार मीना, पोलीस महासंचालक

बाणावली येथील बलात्कार प्रकरणाचे अन्वेषण गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येत आहे. या प्रकरणी दोषींना शिक्षा केली जाणार आहे, अशी माहिती पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी दिली. पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना पुढे म्हणाले, ‘‘बाणावली येथील बलात्कार प्रकरणी गुन्हा प्रविष्ट करून संशयितांना त्वरित कह्यात घेण्यात आले आहे. समुद्रकिनार्‍यांवर पोलीस गस्त वाढवण्यात आली आहे. कोलवा येथे समुद्रकिनार्‍यावर देखरेख ठेवण्यासाठी ३० अधिक पोलीस कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. समुद्रकिनार्‍यांवर ‘सीसीटीव्ही कॅमेरे’ बसवण्यात आले आहेत. पोलीस दलामध्ये ३५ अधिक वाहने समाविष्ट करण्यात आली आहेत, तसेच १५० साहाय्यक उपनिरीक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे. तसेच पोलीस दलातही आणखी भरती करण्यात येत आहे.’’