भिकार्‍यांना भीक मागण्यापासून रोखू शकत नाही ! – सर्वोच्च न्यायालय

  • स्वातंत्र्यानंतर भिकार्‍यांची समस्या भारत सोडवू शकला नाही, हे लज्जास्पद !
  • न्यायालयांमध्ये कोट्यवधी खटले प्रलंबित असतांना अशा सामाजिक समस्यांवर सुनावणी करण्याची वेळी न्यायालयावर येते, याविषयी सरकारी यंत्रणांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक !

नवी देहली – भारतात पसरलेला कोरोनाचा धोका टाळण्यासाठी आणि पुनर्वसनासाठी भिकार्‍यांना रहदारी असलेल्या ठिकाणी अन् बाजारपेठांमध्ये भीक मागण्यापासून रोखण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी केली. भिकार्‍यांना भीक मागण्यापासून रोखू शकत नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती एम्.आर्. शहा यांच्या खंडपिठाने या विषयावर प्रविष्ट केलेल्या याचिकेचा विचार करण्यास नकार दिला. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले, लोक रस्त्यांवर भीक मागण्यामागील एक कारण म्हणजे दारिद्य्र आहे. ही एक सामाजिक आणि आर्थिक समस्या आहे. आपण त्यांच्या मुलांना शिक्षण मिळण्याची व्यवस्था करू शकतो. भिकार्‍यांचे पुनर्वसन आणि लसीकरण यांच्यासंदर्भात याचिकाकर्त्याच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र अन् देहली सरकार यांना नोटीस बजावली आहे.