पुण्यात दोन ठिकाणी दरडी कोसळल्या

तासुबाई मंदिरावर कोसळलेली दरड

लोणावळा – सतत चालू असलेल्या मुसळधार पावसामुळे मावळ तालुक्यातील आंदर मावळ खोर्‍यात कल्हाट येथील तासुबाई मंदिरावर दरड कोसळली. मंदिराचा बहुतांश भाग दरडीखाली गेला आहे; मात्र सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. यापूर्वीही मंदिराजवळ ६ जून या दिवशी डोंगराचा कडा कोसळून शेतीची मोठ्या प्रमाणात हानी झाली होती. ‘सरकारने गावाचे पुनर्वसन करावे’, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

लोणावळ्याजवळील कुसगाव बुद्रुक येथील ओळकाईवाडी येथील डोंगरावर असलेल्या आदिवासी कातकरी पाड्याजवळही मोठी दरड कोसळली आहे. सुदैवाने ही दरड झोपड्यांवर कोसळली नसल्याने मोठी दुर्घटना टळली. ‘प्रशासनाने याची नोंद घेऊन आदिवासींनाही सुरक्षित ठिकाणी हालवावे. अन्यथा आदिवासी कातकरी पाडा दरडीखाली गाडला जाईल’, अशी भीती व्यक्त होत आहे.