शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रदीप नारकर यांची चेतावणी !
एका जिल्हा परिषद सदस्याला तक्रारींवर कार्यवाही होण्यासाठी आंदोलन करावे लागते, तर सामान्य व्यक्तींच्या तक्रारींची नोंद तरी घेतली जात असेल का ?
सिंधुदुर्ग – जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा परिषद अधिनियम आणि शासकीय धोरणे यांची पायमल्ली केली आहे. विकासनिधीचे वाटपही चुकीच्या पद्धतीने केले जात आहे. याविषयी जिल्हा परिषद प्रशासनासह आयुक्तांचेही मागील ४ वर्षांत अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले. जिल्हा परिषद मासिक सभा आणि सर्वसाधारण सभा यांमध्येही विचारणा केली; मात्र ‘चौकशी चालू आहे’, एवढे उत्तर देऊन चालढकलपणा केला जात आहे. त्यामुळे या कारभाराच्या विरोधात आता २ ऑगस्टपासून ठिय्या आंदोलन करणार असल्याची चेतावणी जिल्हा परिषदेच्या पोंभुर्ले मतदारसंघाचे शिवसेनेचे सदस्य प्रदीप नारकर यांनी दिली आहे.
याविषयी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नारकर यांनी म्हटले आहे की,
१. वर्ष २०१७ पासून विकासनिधी चुकीच्या पद्धतीने वाटण्यात आला आहे. माझ्यावर निधीच्या अनुषंगाने झालेल्या अन्यायाविषयी आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाच्या चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आले; मात्र प्रशासनाने अद्याप कोणतीच कार्यवाही केली नाही.
२. ग्रामपंचायतींना दिल्या जाणार्या निधीविषयीची माहिती अनेक वेळा मागणी करूनही देण्यात आली नाही.
३. देवगड पंचायत समितीच्या शिक्षण विभागात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहाराच्या प्रकरणी निलंबित करण्यात आलेले कर्मचारी अल्लमवार यांच्यावर फौजदारी कारवाई करावी.
४. देवगड-विठ्ठलादेवी-काडगेवाडी सौर विद्युत दुहेरी पंप योजनेवर निधी खर्च होऊनही ४ वर्षांपासून योजना अपूर्णावस्थेत आहे. याविषयी ‘संबंधितांवर कारवाई केली जाईल’, असे सांगूनही कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात आहे.
५. देवगड तालुक्यातील काही गावांतील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून बांधलेल्या धूप प्रतिबंधात्मक बंधार्यांविषयी वर्ष २०१७-१८ या कालावधीत तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीत तथ्य असल्याचे याची चौकशी करणार्या अधिकार्यांच्या अहवालातून समोर आले आहे; मात्र ४ वर्षे होऊनही कारवाई झालेली नाही.
६. जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढू धोरणाविषयी सकारात्मक तोडगा निघत नाही, तोपर्यंत २ ऑगस्टला करण्यात येणारे ठिय्या आंदोलन पुढे चालू ठेवणार आहे.