मायेची दोरी सोडल्याविना भगवंतापर्यंत पोचणे कठीण !

१. एका तरुणाला क्षितिजापलीकडील किनार्‍यावर काहीतरी भव्य-दिव्य असल्याची जाणीव होणे, त्याने वृद्ध नावाड्याकडे तेथे जाण्याची इच्छा व्यक्त करणे, नावाड्याने प्रवासाच्या संदर्भात सर्व गोष्टी समजावून सांगणे आणि काही अघटित घडल्यास त्याला हाका मारण्यास सांगणे

‘एक तरुण अथांग पसरलेल्या सागराच्या किनार्‍यावर येतो. क्षितिजापलीकडील किनार्‍यावर काहीतरी भव्य-दिव्य असल्याची त्याला जाणीव होते. समुद्रकिनार्‍यावर असलेल्या एका वृद्ध नावाड्याकडून तो आपल्या मनाला झालेल्या ‘त्या’ जाणिवेविषयी निश्चिती करतो. नावाड्याचे सकारात्मक उत्तर ऐकून आपली तिथे जाण्याची तीव्र इच्छा तो नावाड्याजवळ व्यक्त करतो. तो वृद्ध नावाडी लांब खुंट्याला बांधून ठेवलेल्या एका छोट्या नावेकडे बोट करतो आणि तरुणाला प्रवासाच्या संदर्भात सर्व गोष्टी नीट समजावून सांगतो अन् ‘त्यांतील एकही गोष्ट विसरायची नाही’, अशी समजसुद्धा देतो. शेवटी प्रवासामध्ये अगदीच अघटित काही जर घडलेच, तर ‘माझ्या नावाने जोराने हाका मार’, असे सांगून तो वृद्ध नावाडी त्याला शुभेच्छा देतो.

श्री. शिरीष देशमुख

२. तरुणाने नावेत बसून वल्ही मारायला प्रारंभ करणे, काही काळाने थकवा जाणवल्यावर ‘पैलतीर गाठायचाच’, या निश्चयाने वल्ही मारणे चालूच ठेवणे, अंधार झाल्यावर समोरील काहीच न दिसणे अन् जिवाच्या आकांताने नावाड्याला हाका मारणे

‘कधी एकदा त्या पैलतिरावर जाऊन पोचतो आणि ते ऐश्वर्य उपभोगतो’, असे वाटून तो तरुण लगबगीने त्या नावेत जाऊन बसतो. दुसरा कोणताही विचार न करता तो लगेच झपाझपा वल्ही मारायला प्रारंभसुद्धा करतो. काही काळ जातो. त्याला हळूहळू थकवा जाणवू लागतो; पण ‘काहीही झाले, तरी वल्ही मारणे थांबवायचे नाही. पैलतीर गाठायचाच’, या निश्चयाने तो वल्ही मारणे चालूच ठेवतो; पण आता त्याचे शरीर थकायला लागले होते. हाता-पायांत गोळे येऊन त्याच्या अंगाचा थरकाप उडत होता. रात्र समोर ठाकली होती. त्याच्या दृष्टीपथात आता पैलतीर तर सोडाच, काहीच दिसत नव्हते. सर्वत्र नुसता अंधारच अंधार ! त्याच्या मनात ‘आपण काही चुकलो तर नाही ना ?’, अशी शंकेची पाल चुकचुकते. शेवटी न रहावल्याने जिवाच्या आकांताने तो नावाड्याला हाका मारायला लागतो.

३. वृद्ध नावाडी किनार्‍याजवळ रेतीवर बसलेला असणे आणि त्याने त्या तरुणाला ‘खुंट्याला बांधलेली दोरी सोडली नाहीस का ? त्याविना नाव पुढे कशी जाईल ?’, असे विचारणे

‘अरे, काय झाले बेटा ?’, असे त्या वृद्ध नावाड्याचे प्रेमळ शब्द त्या तरुणाच्या कानावर पडतात. आश्चर्याने तो मागे वळून पहातो, तर तो नावाडी अगदी जवळ, म्हणजे किनार्‍याजवळ रेतीवर बसला होता. त्या वृद्ध नावाड्याने हळूवार विचारले, ‘‘अरे वेड्या, खुंट्याला बांधलेली दोरी आधी सोडायची नाही का ? तू दोरी सोडलीच नाहीस आणि वल्ही मारतो आहेस खुळ्यासारखा ! नाव पुढे जाईल कशी ?’’

४. या गोष्टीचे लक्षात आलेले मर्म 

अ. अथांग सागर म्हणजे आपले जीवन.

आ. उतावळा तरुण म्हणजे साधक.

इ. वृद्ध नावाडी म्हणजे गुरु.

ई. पैलतीर म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनाचे उद्दिष्ट, म्हणजे अंतिम लक्ष्य.

उ. खुंटा म्हणजे ब्रह्म.

ऊ. वल्ही मारणे म्हणजे मार्गदर्शनानुसार केलेले अनुसरण.

ए. दोरी म्हणजे माया.

ही मायेची दोरी जोपर्यंत आपण सोडत नाही, तोपर्यंत आपल्या मनाच्या अवस्थेची नाव आपल्या उद्दिष्टांप्रत पोचणे कठीण आहे.’

संकलक : श्री. शिरीष देशमुख, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.