संभाजीनगर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्तांच्या निवासस्थानातील पाण्याची जोडणी तोडली !

मनसेच्या कार्यकर्त्यांनी आयुक्तांच्या निवासस्थानातील पाण्याची जोडणी तोडली

संभाजीनगर – शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निवासस्थानातील पाण्याची जोडणी १८ जुलै या दिवशी पहाटे तोडली. नागरिकांना पाणी न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशी चेतावणी मनसेने दिली आहे.

आयुक्त आस्तिककुमार पांडेय

शहराला आठवड्यातून एकदा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहराला २ दिवसांआड पाणी मिळेल, असे आश्‍वासन दिले होते; मात्र हे शक्य नाही, असे महापालिकेचे आयुक्त पांडेय यांनी सांगितले. राज्यातील सर्वाधिक पाणीपट्टी शहरातील नागरिकांना द्यावी लागते, मग मुबलक पाणी का नाही ?, असा प्रश्‍न मनसेने उपस्थित केला आहे. मुबलक पाणी न मिळाल्यास, आयुक्तांच्या निवासस्थानातील पाण्याची जोडणी तोडण्याची चेतावणी मनसेने काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली होती. याविषयी आस्तिककुमार पांडेय यांनी स्वतःची भूमिका घोषित न केल्याने मनसेच्या कार्यकर्त्यांनी वरील कृत्य केले.