योगी आदित्यनाथ यांच्या परिश्रमामुळेच उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचे राज्य ! – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक

डावीकडून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

वाराणसी (उत्तरप्रदेश) – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशसाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत. त्यामुळे आज उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले. पंतप्रधान मोदी १५ जुलै या दिवशी वाराणसीच्या दौर्‍यावर होते. या वेळी त्यांनी अनेक महत्त्वाच्या योजनांचे उद्घाटन केले. त्यानंतर एका कार्यक्रमात ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की,

१. वर्ष २०१७ पूर्वीही केंद्रशासनाकडून उत्तरप्रदेशसाठी पैसा पाठवला जात होता; मात्र तेव्हा लक्ष्मणपुरीमध्ये त्याला अडथळा यायचा. आज योगीजी प्रचंड परिश्रम करत आहेत. ते स्वतः प्रत्येक जिल्ह्यात जातात आणि तेथील विकासकामांवर लक्ष ठेवतात. यामुळेच उत्तरप्रदेशात परिवर्तन होतांना दिसत आहे.

२. माफिया राज आणि बोकाळत असलेला आतंकवाद यांना आता कायद्याचा चाप बसला आहे. आता गुन्हेगारांना समजले आहे की, ते कायद्यातून वाचू शकणार नाहीत. उत्तरप्रदेश सरकार आज भ्रष्टाचार आणि घराणेशाही यांपासून मुक्त आहे.

३. उत्तरप्रदेशची लोकसंख्या जगातील अनेक देशांपेक्षा अधिक आहे. तरीही येथील शासन आणि नागरिक यांनी कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा सामना केला.