अंनिसचे मुखपत्र अस्तित्वात असतांना आणखी एक मासिक चालू केल्यामुळे संघटनेतील गटबाजी पुन्हा चव्हाट्यावर !

डॉ. दाभोलकर कुटुंबियांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे संघटनेच्या कार्याध्यक्षांकडून स्वतंत्र मासिक चालू !

स्वत:च्या संघटनेतील गटबाजी रोखू न शकणारे अंनिसवाले समाजाला काय दिशा देणार ?

मुंबई, १२ जुलै (वार्ता.) – अंनिसचा ट्रस्ट आणि संपादकीय मंडळ यांच्या कार्यात डॉ. दाभोलकर कुटुंबियांचा हस्तक्षेप वाढल्यामुळे संघटनेचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी ‘अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ हे स्वतंत्र मासिक चालू केले आहे. या मासिकाचा प्रकाशन सोहळा ११ जुलै या दिवशी पार पडला; मात्र या कार्यक्रमात डॉ. दाभोलकर कुटुंबियांना डावलण्यात आले. ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ हे अंनिसचे मासिक वर्ष १९९० पासून चालू असतांना त्याच धाटणीने वेगळे मासिक चालू करण्यात आल्यामुळे आता एकाच संघटनेची २ मुखपत्रे झाली आहेत. यातून अंनिसमधील गटबाजी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील

यापूर्वीही अंतर्गत गटबाजीमुळे श्याम मानव यांनी अंनिसमधून वेगळे होऊन अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना करून डॉ. दाभोळकर यांना शह देण्याचा प्रयत्न केला होता. आता डॉ. दाभोलकर यांच्या कुटुंबियांच्या हस्तक्षेपामुळे तीच वेळ अविनाश पाटील यांच्यावर येण्याची चिन्हे दिसत असल्याचे म्हटले जात आहे.

डॉ. दाभोलकर कुटुंबियांच्या वाढत्या हस्तक्षेपाविषयी पदाधिकार्‍यांमध्ये खदखद

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समितीचा ट्रस्ट यांच्या वतीने प्रसिद्ध केल्या जाणार्‍या ‘अंधश्रद्धा समिती वार्तापत्र’ या मासिकामध्ये दाभोलकर कुटुंबियांचा समावेश करून समांतर निर्णय प्रक्रिया राबवण्यात येऊ लागली. संपादक मंडळातील सदस्यांनी सर्व प्रक्रियेला फाटा देऊन डॉ. दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर यांना संपादक मंडळामध्ये समाविष्ट केले आणि त्यानंतर संघटनेला त्याची माहिती दिली, असे आरोप अविनाश पाटील यांनी केले आहेत.

अविनाश पाटील यांनी डॉ. दाभोलकर कुटुंबियांवर केलेले गंभीर आरोप

डॉ. दाभोलकर यांच्या हत्येनंतर संघटनेचे कार्याध्यक्ष असलेले अविनाश पाटील यांना ट्रस्टचे कार्याध्यक्ष करण्याऐवजी डॉ. दाभोलकर यांच्या पत्नी शैला दाभोलकर यांच्याकडे डॉ. दाभोलकर यांच्या वारसदार म्हणून हे पद देण्यात आले. याविषयी अविनाश पाटील यांनी ‘ट्रस्ट आणि संघटना यांच्यातील समन्वयासाठी ‘संघटनेचा कार्याध्यक्ष हाच ट्रस्टचाही कार्याध्यक्ष असावा’, अशी भूमिका मांडली होती. संघटनेवर अंकुश ठेवण्यासाठी दाभोलकर कुटुंबियांकडून ट्रस्टचा उपयोग करण्यात येत आहे. दाभोलकर कुटुंबीय अंनिसच्या ट्रस्टद्वारे संघटनेच्या कार्यात हस्तक्षेप करत आहेत, असे आरोपही अविनाश पाटील यांनी केले आहेत.

हे सर्व प्रकार पहाता अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे प्रकाशन हा अंनिसमधील विकोपाला गेलेल्या अंतर्गत वादाचा परिणाम आहे. याविषयी अंनिसच्या एका पदाधिकार्‍यांना संपर्क केला असता अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे संपादक मंडळ आम्हाला विचारात घेत नसल्यामुळे हे नवीन मासिक प्रकाशित करावे लागले, असे त्यांनी सांगितले. दाभोलकर कुटुंबीय आणि अंनिसचे पदाधिकारी यांमध्ये चालू असलेल्या कुरघोडींचेही त्यांनी समर्थन केले.