केंद्रातील ७८ मंत्र्यांपैकी ३३ मंत्र्यांवर आहे गंभीर गुन्ह्यांची नोंद !

२४ मंत्र्यांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडा आदी गंभीर गुन्हे !

नवी देहली – केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्तारानंतर आता मंत्र्यांची एकूण संख्या ७८ झाली आहे; मात्र त्यांतील ४२ टक्के म्हणजे ३३ मंत्र्यांच्या विरोधात विविध गुन्हे नोंद आहेत. त्यातही २४ जणांच्या विरोधात हत्या, हत्येचा प्रयत्न, दरोडे घालणे यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत. ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म’ने (‘ए.डी.आर्.’ने) याविषयीच्या माहितीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. या सर्व मंत्र्यांनी निवडणुकीच्या वेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिलेल्या माहितीवरून ही माहिती समोर आली आहे.

गृह राज्यमंत्री निसिथ प्रामाणिक यांच्यावरच हत्येचा गुन्हा !

मंत्रीमंडळातील सर्वांत तरुण मंत्री असलेले आणि केंद्रीय गृह राज्यमंत्रीपद दिलेले ३५ वर्षीय निसिथ प्रामाणिक यांच्या विरोधात भादंविच्या कलम ३०२ नुसार हत्येचा गुन्हा नोंद आहे. विशेष म्हणजे त्यांचे शिक्षण अवघे ८ वीपर्यंत झाले आहे. त्यांच्या व्यतिरिक्त जॉन बारला, पंकज चौधरी आणि व्ही. मुरलीधरन् या मंत्र्यांच्या विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा कलम ३०७ नुसार गुन्हा नोंद आहे.

१५ टक्के मंत्री ८ वी ते १२ वी शिकलेले !

नव्या मंत्रीमंडळातील १५ टक्के म्हणजेच १२ मंत्र्यांचे शिक्षण हे ८ ते १२ वी पर्यंतच  झाले आहे. ६४ मंत्र्यांचे शिक्षण पदवी आणि त्यापेक्षा अधिक आहे. २ मंत्र्यांनी डिप्लोमा केला आहे. १७ मंत्री पदवी, २१ मंत्री पदव्युत्तर, तर ९ मंत्र्यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे.