फलटण (जिल्हा सातारा) शहरासह तालुक्यातील ४० गावांच्या पाणीयोजना अडचणीत

नीरा उजवा कालवा

सातारा – फलटण शहरासह तालुक्यातील अनुमाने ४० गावांच्या पिण्याच्या पाणीयोजना नीरा उजवा कालव्यावर अवलंबून आहेत. कालवा बंद झाल्यानंतर १५ दिवसांहून अधिक काळ या पाणीयोजना कार्यान्वित राहू शकत नाहीत. २१ जून या दिवशी कालवा बंद झाला, तो ६ जुलै या दिवशी पुन्हा चालू होणे अपेक्षित होते; मात्र तो चालू न झाल्यामुळे तालुक्यातील बागायती पट्ट्यामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

फलटण शहरातील पाणीपुरवठा योजनेच्या साठवण तलावातील पाणीसाठा अल्प आहे. कालव्याला पाणी सोडले नाही, तर पुढील आठवड्यापासून फलटणवासियांना पाणीकपातीच्या संकटाला सामोरे जावे लागेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. यामध्ये प्राधान्याने कोळकी, तरडगाव, साखरवाडी, विडणी आदी गावांचा समावेश होऊ शकतो. या हंगामातील तुटणारा ऊस, आता तुटलेल्या उसाला खोडवा, जूनमधील उसाच्या लागणीसाठी आणि १५ जुलैपासून चालू होणार्‍या ऊस लागवडीसाठी, तसेच गुरांचा चारा आणि खरीपातील अन्य पिकांसाठी कालव्याच्या पाण्याची तातडीने आवश्यकता आहे; मात्र कालव्यात अद्याप पाणी न सोडल्यामुळे तालुक्यातील शेतकरी धास्तावला आहे.