उपजतच अध्यात्माची ओढ आणि शिस्तबद्ध आचार-विचार यांमुळे सनातन संस्थेशी जोडलेले संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी !

चैत्र कृष्ण प्रतिपदा (२८.४.२०२१) या दिवशी संभाजीनगर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे अधिवक्ता चारुदत्त जोशी यांचे कोरोनामुळे निधन झाले. संभाजीनगर येथील (पू.) निवृत्त जिल्हा न्यायाधीश चपळगांवकर यांना त्यांच्यासह सेवा करणार्‍या अधिवक्ता कै. चारुदत्त जोशी यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

पू. (निवृत्त न्यायाधीश) सुधाकर चपळगावकर

१. अधिवक्ता चारुदत्त जोशी यांनी एका सेवेच्या संदर्भात केलेली सिद्धता आणि कागदपत्रांची पूर्तता पाहिल्यावर समाधान होणे अन् ‘त्यांना सर्व  दायित्वाची जाणीव आहे’, असे लक्षात येणे

‘अधिवक्ता चारुदत्त जोशी आणि माझी ओळख १३ – १४ वर्षांपासूनची आहे. त्या वेळी माझ्याकडे एक वेगळ्या प्रकारची सेवा चालू होती. त्या सेवेच्या संदर्भात अधिवक्ता चारुदत्त जोशींनी केवळ चर्चा न करता आवश्यक ती सर्व सिद्धता आणि कागदपत्रांची पूर्तता केली. त्यांची सिद्धता पाहिल्यावर एक वकील म्हणून माझे समाधान झालेच, तसेच ‘तिथे उपस्थित असलेल्या अन्य सर्वांनासुद्धा पुष्कळ मोठा आधार मिळाला’, असे माझ्या लक्षात आले. तेथील उपस्थितांच्या तोंडवळ्यावर आनंद आणि समाधान स्पष्टपणे दिसून येत होते. त्या वेळी ‘चारुदत्तला दायित्वाची ही सर्व जाणीव आहे’, असे माझ्या लक्षात आले. तेव्हा माझ्या असेही लक्षात आले की, हे केवळ नुसते बोलणारे नाही, तर निश्चित कृती करून त्याबद्दल आश्वस्त करणारे व्यक्तीमत्त्व आहे.

२. चारुदत्त यांच्याशी न्यायालयीन कामांविषयी चर्चा करतांना स्वतःच्या विचारप्रक्रियेला चालना मिळत असल्याचे लक्षात येणे

त्यानंतर चारुदत्त माझ्या सहवास वरचेवर येऊ लागला. आमची उच्च न्यायालयात भेट झाली की, न्यायालयीन कामांविषयी तो चर्चा करत असे. अशा प्रकारे आमचा न्यायालयीन कामे करण्याचा एकत्र प्रवास चालू झाला. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपिठामध्ये मी जिथे बसतो, तिथे अध्यात्मावर चर्चा करण्यासारखे वातावरण नव्हते. त्यामुळे मी आणि चारुदत्त तळमजल्यावर असलेल्या अधिकोशामध्ये बसून चर्चा करत असू. मी चारुदत्तपेक्षा वय, अधिकार आणि साधना यांमध्ये पुष्कळ पुढे होतो, ज्येष्ठ होतो, तरीसुद्धा त्याच्याशी झालेल्या चर्चेतून माझ्या लक्षात आले की, चारुदत्त माझ्या समोर काही सूत्रे अगदी व्यवस्थितपणे मांडतो. ज्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेला नुसती चालनाच नव्हे, तर योग्य वळणही मिळत आहे.

३. एखाद्या सूत्रावरील ‘स्वतःचा दृष्टीकोन योग्य आहे कि नाही ?’, असे वाटल्यास त्यावरील चारुदत्त यांचे मत उपयुक्त वाटणे

एखादे सूत्र किंवा एखादा प्रश्न मी काही विचारार्थ समोर घेतो, तेव्हा ‘त्याकडे पहाण्याचा माझा दृष्टीकोन योग्य आहे किंवा नाही ?’ किंवा ‘त्यात थोडा पालट करायला पाहिजे’, असे मला वाटते, त्या वेळी चारुदत्तचे मत मला उपयुक्त वाटते. ‘एखाद्या गोष्टीविषयी माझे चिंतन-मनन अल्प पडत आहे’, हे आमच्या चर्चेतून चारुदत्तच्या लक्षात आल्यास तो अत्यंत नम्रपणे ते माझ्या निदर्शनास आणून देत असे.

४. चारुदत्त यांच्यामध्ये असलेले वेळेचे गांभीर्य आणि शिस्तबद्धता

अधिवक्ता चारुदत्त जोशी

४ अ. चारुदत्त यांच्या आचार-विचारांत मुळातच शिस्त असल्यामुळे त्यांच्या समवेत सेवा करतांना अडचण न येणे : ‘एवढ्या सर्व साधकांमधून चारुदत्तच माझ्या जवळ कसा आला ?’, असे कदाचित कुणाला वाटेल. याचे कारण म्हणजे शिस्तीविषयी माझे काही नियम आहेत. ‘साधकांनी दिलेली वेळ पाळली पाहिजे’, याविषयी मी जागरूक असतो. मी माझ्या व्यस्त दिनक्रमातून साधकांना भेटण्यासाठी एखादी वेळ ठरवतो. तेव्हा मला त्याची सकाळपासूनच जाणीव असते आणि त्यासाठी मी वेळ राखून ठेवलेला असतो. साधकांनी विसरून जाऊन वेळच पाळली नाही किंवा त्याविषयी मला काहीच कळवले नाही, तर अशा साधकाच्या समवेत मला काम करता येणे शक्य होत नाही. मला प्रश्न टाळलेला किंवा खोटे बोललेले मुळीच चालत नाही. ‘सेवा करतांना एकमेकांना विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक असते. एकमेकांच्या समवेत सेवा करणार्‍यांची सेवा वेगवेगळी काढता येत नाही’, अशा अनेक गोष्टी हळूहळू चारुदत्तच्या लक्षात येऊ लागल्या. मुळातच त्याचा स्वभाव शिस्तप्रिय असणार. त्यामुळे त्याला हे सर्व मुळीच जड गेले नाही. ‘त्याला स्वतःमध्ये पालट करण्याची आवश्यकता भासली असेल’, असे मला कधीच जाणवले नाही. ‘तो माझ्या आवश्यकतेनुसार वागत आहे’, हे त्याच्या वागण्यावरूनच माझ्या लक्षात आले.

४ आ. प्रवासाला जातांना नियोजित वेळेच्या आधीच १० मिनिटे सिद्ध रहाणारे चारुदत्त ! : आम्हाला कुठे प्रवासाला जायचे असल्यास आदल्या दिवशीच संपूर्ण चर्चा होऊन सर्व सुनिश्चित केले जात असे. त्या वेळी दिलेल्या वेळेपेक्षा १० मिनिटे आधीच चारुदत्त ठरलेल्या ठिकाणी उपस्थित रहात असे.

१. एकदा ‘मला गोव्याला जावे’, असे वाटले आणि अकस्मात् दुसर्‍याच दिवशी माझे गोव्याला जायचे ठरले. तेव्हा चारुदत्तने लगेच माझ्या समवेत येण्याचे मान्य केले. तो दुसर्‍या दिवशी सकाळी नियोजित वेळेच्या आधीच येऊन थांबला होता.

२. गोव्याहून परत येतांना पहाटे लवकर निघण्याचे नियोजन झाले होते. तेव्हाही चारुदत्तने वेळेपेक्षा १५ मिनिटे आधीच सर्व सिद्धता करून ठेवली होती.

४ इ. एकदा मी परात्पर गुरु पांडे महाराज यांना श्रद्धांजली वहाण्यासाठी पनवेलला जाणार होतो. तेव्हा चारुदत्तही लगेचच माझ्या समवेत येण्यास सिद्ध झाला.

चारुदत्तच्या अंगी वेळेची शिस्त असल्यामुळे तो सतत माझ्या समवेत सेवेमध्ये तत्पर राहिला.

५. ‘एका संतांनी ‘चारुदत्त आणखी कोणती सेवा करू शकतात ?’, याविषयी स्वतः सांगितलेले पाहून ‘संतांनी त्यांचे गुण हेरले आहेत’, असे जाणवणे आणि त्यानंतर चारुदत्त सनातन संस्थेशी अधिक जोडले जाणे

एकदा एका संतांशी बोलतांना माझ्या समवेत चारुदत्तही होता. माझे संतांशी बोलणे झाल्यानंतर चारुदत्त त्या संतांशी बोलत होता. तेव्हा संतांनी २ – ३ उत्तरदायी साधकांना बोलावून घेतले आणि ‘चारुदत्त आणखी कोणती सेवा करू शकतो ?’, याविषयी त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर ते संत त्यांच्या कक्षात गेले आणि चारुदत्तच्या सेवेसंबंधी बोलण्यासाठी पुन्हा ३ वेळा बाहेर आले. तेव्हा ‘संत एका साधकासाठी पुनःपुन्हा बाहेर येऊन ‘चारुदत्त अजून कशी सेवा करू शकतो ?’, याविषयी सांगत आहेत’, याचे मला पुष्कळ आश्चर्य वाटले. ‘संतांनी चारुदत्तमधील गुण हेरले असल्यामुळे ते असे सांगत आहेत’, असे माझ्या लक्षात आले. या घटनेनंतर चारुदत्त सनातन संस्थेशी भावनिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या पुष्कळच जोडला गेला.

माझ्याजवळ चारुदत्तच्या बर्‍याच आठवणी आहेत. चारुदत्तचा अध्यात्माकडे असलेला ओढा आणि सनातन संस्थेशी जुळलेले नाते यांमुळे तो नेहमी माझ्या समवेत यायचा. त्याने आध्यात्मिकदृष्ट्या त्याचा लाभही करून घेतला. माझ्याप्रतीही त्याला पुष्कळ लोभ आणि आदर होता.

‘अध्यात्मामध्ये मला साहाय्य करणारा एक मित्र मी गमावला आहे’, असे मला प्रकर्षाने जाणवत आहे.’

– (पू.) निवृत्त जिल्हा न्यायाधीश सुधाकर चपळगावकर, संभाजीनगर (१०.६.२०२१)